Pune Water Supply: पुणेकरांसाठी मोठी बातमी! भविष्यात भीषण पाणीटंचाई टाळण्यासाठी ‘मुळशी’ अन् ‘भामा’ खोऱ्यावर नजर
Pune Water Supply: पीएमआरडीए हद्दीत वाढत्या नागरीकरणामुळे दररोज २०० एमएलडी अतिरिक्त पाण्याची गरज; नीती आयोगाच्या ग्रोथ हब आराखड्यात सुचवले उपाय.

Pune Water Supply- पुणे आणि परिसरातील झपाट्याने वाढणारे नागरीकरण, लोकसंख्येतील वाढ आणि औद्योगिक विस्तारामुळे भविष्यात पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यासाठी पुणे क्षेत्राला दररोज सुमारे २०० एमएलडी अतिरिक्त पाण्याची आवश्यकता असल्याचे पुणे ग्रोथ हबच्या आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुळशी धरणातून सात टीएमसी पाणी उपलब्ध करून घेणे, भामा खोऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा करणे,
सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे आदी उपाययोजना आराखड्यात सुचविण्यात आल्या आहेत. नीती आयोगाच्या ग्रोथ हब उपक्रमांतर्गत पुणे आर्थिक क्षेत्राचा सर्वंकष विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये पुढील दहा वर्षांत पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह पीएमआरडीएच्या हद्दीत सुमारे १५ ते २० लाख नवीन रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे आगामी काळात पुणे महानगर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होणार आहे.
त्यामुळे साहजिकच पाण्याचीही मागणी वाढणार आहे. त्यासाठी पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन हाती घेतले आहे. मुळशी धरणातून सात टीएमसी पाणी उपलब्ध करून घेण्याचा प्रस्ताव या नियोजनातील महत्त्वाचा भाग आहे. यामुळे भविष्यातील पाणीपुरवठ्याला अतिरिक्त स्रोत उपलब्ध होऊ शकतो. मात्र, यासाठी आवश्यक तांत्रिक व्यवहार्यता, पाणीवाटप, संबंधित यंत्रणांमधील समन्वय आणि अंमलबजावणीची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.
पाण्याचे स्रोत वाढविण्याबरोबरच उपलब्ध पाण्याचे वितरण अधिक कार्यक्षम करणे आवश्यक आहे. वितरण यंत्रणेतील गळती, पाण्याचा अपव्यय आणि असमान पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणेचे आधुनिकीकरण केल्यास पाण्याचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळेल, असेही या आराखड्यात नमूद केले आहे.
सांडपाणी पुनर्वापरावर भर
नवीन जलस्रोतांबरोबरच उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर करण्यावरही आराखड्यात भर देण्यात आला आहे. शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते औद्योगिक वापर, बांधकामे, उद्याने आणि अन्य बिगरपिण्याच्या कारणांसाठी वापरण्याची क्षमता वाढविणे आवश्यक आहे.
धरणातील गाळ काढण्याची सूचना
सध्याच्या जलसाठ्यांची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी धरणे आणि अन्य जलसाठ्यांमधील गाळ काढण्याच्या उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत. अनेक वर्षांपासून साचलेल्या गाळामुळे जलसाठ्यांची उपयुक्त क्षमता कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे गाळ काढल्याने उपलब्ध साठवण क्षमतेचा अधिक प्रभावी वापर करता येऊ शकतो.






