Pune Water Scarcity : तर पाणी ऑगस्टपर्यंत पुरले असते…पाटबंधारे विभागाचा पुणे महापालिकेवर निशाणा
Pune Water Scarcity : हवामान खात्याच्या कमी पावसाच्या अंदाजानंतर जलसंपदा विभागाने दिली होती कपातीची सूचना; पालिकेने दुर्लक्ष केल्याचा दावा.

Pune Water Scarcity – खडकवासला प्रकल्पातील पाणी ३१ जुलैपर्यंत पुरेल अशा पद्धतीने पाणीसाठ्याचे नियोजन दरवर्षी केले जाते. यंदा हवामान खात्याने पावसाचे प्रमाण कमी असल्याची शक्यता वर्तविली आहे. यामुळे पाणी पुरवठ्यात १५ टक्क्यांनी कपात करावी, असे पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेला दिले होते. पत्रानुसार कपात केली असती तर पाणी ऑगस्टपर्यंत पुरले असते, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली.
हवामान खात्याने एल-निनो व आयओडी प्रभावाबाबत वर्तविलेल्या अंदाजावर मार्चमध्ये अधिवेशानत चर्चा झाली होती. मान्सूनचे प्रमाण कमी असल्याचे नमूद केल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचा काटेकोर वापर करा अशा सूचना जलसंपदा मंत्र्यांनी दिल्या. धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि भविष्यात अवर्षणप्रवण परिस्थिती निर्माण झाल्यास पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे क्रमप्राप्त आहे.
यामुळे ३१ ऑगस्ट पर्यंत पिण्याचे पाणी देता येईल आणि पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. त्यासाठी दरमहाच्या णी पुरवठ्यात पंधरा टक्के पाणी कपात करावी आणि त्यासाठी पालिकेने आपल्या स्तरावर योग्य ते नियोजन करावे असेही पालिकेला पाठविलेल्या पत्रात जलसंपदा विभागाने म्हटले होते. पालिकेतील सत्ताधारी पक्षाने पाणी कपात करणार नसल्याचे सांगत जलसंपदा विभागाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.
यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पावसाची स्थिती गंभीर असल्यास धरणांमधील पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत पुरेल, असे नियोजन करावे, हे नियोजन केले महापालिकेने केले नाही तर त्याचा फटका पुणेकरांना बसणार आहे. त्यामुळे पाणीकपात करावी की नाही हे पालिकेनेच ठरवावे,’ असे स्पष्ट केले होते. त्यावरही पालिकेने कोणताही निर्णय घेतला नव्हता.
पुणे शहराला खडकवासला धरणसाखळी प्रकल्पासून पाणी पुरवठा केला जातो. या चारही धरणात मिळून सध्या ५.७२ टीएमसी म्हणजे १९.६३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला दरमहा सव्वा ते दीड टीएमसी पाणी लागते. त्यामध्ये पंधरा टक्के कपात केल्यानंतर सुमारे अडीचशे ते तीनशे एमएलडी पाण्याची कपात करावी लागणार होती.
धरणातील पाण्याची स्थिती
1.धरणाचे नाव – उपलब्ध पाणीसाठा – टक्केवारी
2.खडकवासला – ०.९९ टीएमसी – ४९.९७ टक्के
3.पानशेत – २.५४ टीएमसी – २३.८१ टक्के
4.वरसगाव – २.२१ टीएमसी – १७.२७ टक्के
5.टेमघर- ० टीएमसी -० टक्के





