Rain Alert : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जोर वाढणार.! ‘या’ जिल्ह्यांना 24 तास धोक्याचे; हवामान विभागाने दिला इशारा
मॉन्सून राज्याच्या उंबरठ्यावर असतानाच अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक भागांतील हवामान ढगाळ झाले.

Rain Alert : राज्यातील वातावरणात गेल्या काही दिवसांत मोठा बदल पाहायला मिळत आहे. तीव्र उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना आता पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 24 तासांसाठी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा इशारा दिला आहे.
विशेषतः छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जालना आणि जळगाव जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आणि नागरिकांना काळजी गणेयास सांगितलं आहे.
मॉन्सून राज्याच्या उंबरठ्यावर असतानाच अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक भागांतील हवामान ढगाळ झाले असून सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता कायम आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काही भागांत रस्त्यांवर पाण्याचे लोट पाहायला मिळाले. तासभर झालेल्या या पावसामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होण्याची शक्यता असून खरीप हंगामापूर्वीच्या मशागतीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातही पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावली. शहरासह अनेक ग्रामीण भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसरातही पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला.
शेतजमिनीत काही प्रमाणात ओलावा निर्माण झाल्याने खरीपपूर्व मशागतीला मदत होणार आहे. मात्र, उघड्यावर साठवून ठेवलेला कांदा, भाजीपाला आणि इतर कृषी मालाचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आणि भडगाव तालुक्यांमध्येही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. भडगाव तालुक्यातील गुढे-जुवार्डी आणि आडळसे परिसरात गारपीट झाल्याची नोंद आहे.
त्यामुळे शेतातील पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. याआधीही राज्यातील अनेक भागांत झालेल्या गारपिटीमुळे फळबागा आणि विविध पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
हवामान विभागाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. वादळी वाऱ्याच्या काळात झाडाखाली किंवा असुरक्षित ठिकाणी थांबणे टाळावे, तसेच शेतकऱ्यांनी काढणी केलेला कृषी माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
एकूणच, उष्णतेपासून दिलासा देणारा हा पाऊस नागरिकांसाठी सुखावह असला तरी गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेती व मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने पुढील 24 तास महत्त्वाचे ठरणार आहेत. मॉन्सूनपूर्व वातावरणातील या बदलाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






