पुणे: मुठा व पवना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग होण्याची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे – पुणे शहराजवळील खडकवासला धरण ९०.३९ टक्के, पानशेत, वरसगाव आणि टेमघर १०० टक्के एवढ्या क्षमतेने भरलेले आहे. पिंपरी चिंचवड शहराशी संलग्न असलेले पवना धरण १०० टक्के क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे पुढील पावसाळा कालावधीसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांनी सतर्क व दक्ष राहणे आवश्यक आहे.
२४ ते २९ सप्टेंबर या कालावधीत हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज दिल्यामुळे मुठा व पवना नदीपात्रात येव्या नुसार व मोठ्या प्रमाणात विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पर्जन्यमानानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्यात येईल.
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी मुठा नदीपात्र व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी पवना नदीपात्रातील निषिद्ध क्षेत्रामध्ये (ब्लू लाईन) उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. सखल भागातील संबंधीत नागरीकांनी नदीपात्रात उतरू नये.
ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुठा व पवना नदीचे निषिद्ध क्षेत्र त्वरीत रिक्त करुन योग्य ती खबरदारी व दक्षता घेण्यात यावी, असा इशारा पुणे विभागातील खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियत्यांनी दिला आहे.





