Pune: कोथरूडच्या रस्त्यावर पाणीच पाणी

कोथरूड – दिवसभर उकाड्याने हैराने झालेल्या कोथरूडरांना दुपारी सुरू झालेल्या पावसाने दिलासा दिला. मात्र, क्षणभर दिलासा वाटला तरी पावसाचा वाढलेला जोर, रस्त्यावर साचलेले पाणी घरे, दुकान, हाॅटेल आणि सोसायट्यांमध्ये शिरल्यावर नागरिकांची धांदल उडाली. त्यामुळे पहिल्याच पावसात कर्वे रस्ता आणि पौड रस्ता पाण्याखाली गेला आणि महापालिकेच्या कामाची पोलखोल झाली.
दुपारी साडेचार ते पावणेपाचच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. थोडावेळ पडेल आणि विश्रांती घेईल, असे वाटत असताना पावसाचा जोर वाढत गेला. तासभर पडलेल्या पावसामुळे कर्वे रस्त्यावरील कर्वे पुतळा चौक, छत्रपती शिवाजी चौक, शास्त्रीनगर, करिश्मा चौक, कोकण एक्स्प्रेस, एसएनडीटी, नळस्टाॅप चौक, तसेच पौड रोडवर कोथरूड डेपो चौक, भारती नगर, कचरा डेपो, वनाज काॅर्नर, जयभवानीनगर, आनंदनगर, मोरे विद्यालय आणि केळेवाडी चौकात पाणी साचले होते. काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्यामुळे वाहतूक मंदावली. त्यामुळे कर्वे रस्ता आणि पौड रस्त्यावर वाहनांच्या लांबपर्यंत रांगा गेल्याने कोंडी झाली.
वेदभवन येथे धबधबे….
एनडीए चौकातील नवीन उड्डाणपूल आणि सर्व्हिस रस्त्याचे काम पूर्ण झाले आणि पहिल्याच पावसात हे रस्ते पाण्याखाली गेले. महामार्गावर साचलेले पाणी वेदभवन बाजूच्या पडत होते. धो-धो पाऊस, त्यात महामार्गावर साचलेले पाणी जाण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने पाण्याने पाईप तोडले. त्यामुळे याठिकाणी धबधबे सुरू झाल्याची परिस्थिती होती. परिणामी येथील रत्यांना नदीचे स्वरूप आले होते. मात्र, त्यामुळे नागरिकांनी तारांबळ उडाली.
सोसायट्यांत शिरले पाणी…
कर्वे पुतळा चौकात गुडघाभर पाणी साचल्यामुळे पदपथावजवळ असलेले हाॅटेल, दुकाने आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. त्यावेळी स्थानिक नागरिक उमेश भेलके, जयदीप पडवळ, संदीप मोकाटे, सागर जगताप यांनी मदतकार्य केले. दिनानाथ रूग्णालयाजवळी पुरग्रस्त वसाहतीत पावसाळी लाइनचे काम न झाल्यामुळे येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. राम बोरकर आणि तरूणांनी तत्काळ मदतकार्य केले. तसेच शास्त्रीनगर येथील मोहोळ चाळ, भुसारी काॅलनी, सागर काॅलनीतील श्रीकृष्ण नगर, शिंदे काॅलनी याठिकाणच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
वारजे आणि बावधनमध्ये धो-धो
वारजे आणि बावधन परिसरात धो-धो बरसला. यावेळी रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. वारजे येथील स्वर्गीय रमेश वांजळे उड्डाणपुलाखाली पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. तसेच, महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यावरही ठिकठिकाणी पाणी साचले. काही सोसायटी आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. बावधन परिसरात उत्तमनगर, बावधन गाव यासह बावधन-पाषाण रस्त्यावर पाट वाहत होते.





