Pune Rain Update: अवघ्या ६ दिवसांत ओलांडली जुलैची सरासरी; २४ तासांत १०८ मिमी विक्रमी पाऊस
Pune Rain Update: पुणे शहर आणि परिसरात गेल्या ३६ तासांत चालू हंगामातील सर्वोच्च १६१ मिमी पावसाची नोंद; जिल्हा प्रशासनाकडून शाळांना सुट्टी.

Pune Rain Update – रविवारी सायंकाळपासून जोर धरलेल्या पावसाने सोमवारीही जोर कायम ठेवल्याने २४ तासांत १०८ मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. या विक्रमी पावसाने जुलै महिन्याची सरासरी अवघ्या सहा दिवसांत ओलांडली आहे. शहरात जुलैमध्ये सरासरी १८५-२०० मिमी पाऊस पडतो. गेल्या सहा दिवसांत २१२ मिमी पाऊस झाला आहे. या पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले असून, जनजीवन ठप्प झाले आहे. पावसाचा दणका एवढा मोठा होता की धरणातून पाणी सोडले नाही तरी पूरस्थिती निर्माण झाली.
शहर परिसराला गेल्या ३६ तासांत मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. शहरात तब्बल १६१ मिमी पावसाची नोंद झाली असून, चालू हंगामातील हा सर्वाधिक पाऊस आहे. लोहगाव परिसरात २४३, चिंचवडमध्ये ३४१, पाषाण येथे १८३, तर एनडीए १३४ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. रविवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून दमदार हजेरी लावलेल्या पावसाने रात्री उशिरापर्यंत जोर कायम ठेवला.
रविवारी सकाळी ८ ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत अवघ्या २४ तासांत पावसाने १०८ मिमीचा आकडा गाठला. सोमवारी सकाळपासून शहरासह उपनगरांत पावसाचा जोर आणखी वाढला. अवघ्या आठ ते नऊ तासांत तब्बल ५५ मिमी पाऊस झाला. या धुवांधार पावसामुळे उपनगरांतील प्रमुख रस्ते, चौक पाण्याखाली गेले असून, रस्त्यांना ओढ्या-नाल्यांचे स्वरूप आले आहे. जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी दिल्यामुळे आज सकाळी रस्त्यांवर नेहमीची वर्दळ नव्हती.
अनेक ठिकाणी रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने सकाळी चाकरमान्यांना, वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. संततधार पावसामुळे शहरातील ओढे- नाले दुथडे भरून वाहू लागले आहेत. मुठा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढत होते. सायंकाळी मध्यवर्ती भागात पावसाने काहीशी विश्रांती घेतली. मात्र, पुढील २४ तासांत शहरासह जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून, पावसाची संततधार सुरू राहील. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
जुलैमधील चौथा सर्वाधिक पाऊस
पुण्यात संपूर्ण जुलै महिन्यात सरासरी १८५-२०० मिमी पाऊस पडतो. ही सरासरी अवघ्या सहा दिवसांत पार करताना पावसाने २१२ मिमी पावसाची नोंद केली सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत १०८ मिमी विक्रमी पाऊस नोंदवला गेला. हा जुलै महिन्यातील ६८ वर्षांतील चौथा सर्वाधिक पाऊस आहे.






