pune : प्रभागनिहाय मतदार यादी गुरुवारी होणार जाहीर

प्रारूप मतदारयादीवर हरकती नोंदविण्यासाठी नागरिकांना मुदत
पुणे – पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, गुरुवारी (दि. ६) प्रारूप मतदारयादी जाहीर होणार आहे. मतदारयादीच्या विभाजनात प्रभाग रचनेप्रमाणेच मतदार याद्यांची तोडफोड झाल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर, महापालिकेकडून या याद्यांची पुन्हा छाननी करण्यात आली असून,
या तक्रारीनंतर मुकादम व अन्य कर्मचाऱ्यांचे लॉगइन काढून घेण्यात आले आहे. प्रारूप मतदारयादीवर हरकती नोंदविण्यासाठी नागरिकांना मुदत दिली जाणार असल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे, मतदारयादीबाबत झालेले आरोप आणि महापालिकेने केलेला दावा यातील नेमके तथ्य या याद्या जाहीर झाल्यानंतरच समोर येणार आहे.
महापालिकेची प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आता ४१ प्रभागांमधून १६५ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. ही रचना २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येवर आधारित असून, १ जुलै २०२५ पर्यंतची मतदार नोंदणी वैध धरली आहे.
शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांसह शिरूर, पुरंदर आणि भोर-वेल्हा या विधानसभा मतदारसंघांतील शहरी भागातील मतदारांचाही समावेश या निवडणुकीत करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यासाठी १४ ऑक्टोबर रोजी पुणे महापालिकेला यादी सुपूर्त केली होती. त्यानंतर ६ नोव्हेंबरपर्यंत प्रारूप यादी जाहीर करण्याची मुदत देण्यात आली होती. मागील २० दिवसांपासून १५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत हे काम सुरू हे काम संपले असून, त्यानंतर आता स्वतंत्रपणे या याद्यांची तपासणी केली जात आहे.
दरम्यान, २०११ च्या जनगणनेनुसार प्रभागातील लोकसंख्या लाखाच्या आत ठेवण्यात आली होती. मात्र, जुलै २०२५ पर्यंतच्या मतदार नोंदणीमुळे सध्याच्या मतदारसंख्या बहुतेक प्रभागांमध्ये लाखाच्या वर गेली आहे. काही प्रभागांतील मतदारसंख्या पावणेदोन लाखांवर पोहोचली आहे. परिणामी अनेक इचछुकांना मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.





