पुणे : प्रभाग तुटला की तोडला?

कात्रज (धिरेंद्र गायकवाड) – महानगरपालिकेची प्रारुप प्रभाग रचना जाहीर होण्याच्या एक दिवस आधीच प्रभागांची नावे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर झाल्याने सर्वांचा गोंधळ उडाला. आज (मंगळवारी) क्षेत्रीय कार्यालयामध्ये प्रभागांच्या भागांचे नकाशे उपलब्ध झाल्यानंतर सर्व परिसरामध्ये त्याचे “पीडीएफ’ अपलोड होताना दिसले. कात्रज, धनकवडीसह बालाजीनगर परिसर प्रभाग रचनेसह कोणता प्रभाग तुटला की तोडला? यासह नव्याने जोडला याबाबतही चर्चा रंगली.
जुना प्रभाग क्र. 38 मधील बालाजीनगर हा भाग आता नवा प्रभाग क्र. 49 म्हणून बालाजी नगर-के. के. मार्केट असा तयार झाला आहे. तर जुना प्रभाग क्र. 39 धनकवडीचा नवा प्रभाग क्र. 55 धनकवडी-आंबेगाव पठार भौगोलिकदृष्ट्या मोठा प्रभाग असून तो नऱ्हे पर्यंत पसरला आहे. धनकवडी गावठाण यापासून तुटला असून नव्याने सिंहगड कॉलेज शिवसृष्टीपासून पुढील भाग जोडला गेला आहे. प्रभाग क्र. 39 जुना यातील काही भाग हा नवा प्रभाग क्र. 56 चैतन्यनगर – भारती विद्यापीठ असा झाला आहे. जुना प्रभाग क्र. 38 यामधील नवा प्रभाग क्र. 57 सुखसागर नगर-राजीव गांधीनगर असा तयार झाला आहे.
कात्रज परिसरातील जुना प्रभाग क्र. 40 हा आता नवा प्रभाग क्र. 58 कात्रज-गोकुळ नगर झाला आहे. यातील काही भाग आंबेगावचा नवा प्रभाग क्र. 54 यामध्ये देखील गेला आहे. भौगोलिकदृष्ट्या प्रभाग क्र. 58 मोठा असून यामध्ये कात्रज गावठाणच्या चार वाड्या व डोंगर भाग समाविष्ट आहे.
पक्षीय बलाबल बदलणार?
पुणे शहराच्या दक्षिण उपनगर परिसरातील सर्वच प्रभागांची कमी-अधिक प्रमाणात बदली आहे. या परिसरामध्ये राजकीयदृष्ट्या पक्षीय बलाबल पाहिले तर राष्ट्रवादी कॉंग्रेस त्यानंतर भाजप यांची सत्ता आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये नव्याने समाविष्ट भागातील नवे उमेदवार व नवे पक्षीय राजकीयदृष्ट्या राजकारणामध्ये आपले नशीब आजमावून पाहण्यासाठी तयार असून जुन्या प्रभागातील सद्यस्थित नगरसेवक आपली बाजू भक्कम असल्याचे सांगत आहेत. काही ठिकाणी स्वपक्षीय याबरोबरच हातमिळवणी करावी लागेल, असे नाही तर काही ठिकाणी विरोधी पक्षातील उमेदवारांना आपल्या पक्षांमध्ये घेण्याचे मनसुबे असणार आहेत.





