पुणे – दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या व्दितीय स्मृतिदिनानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनतर्फे ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. त्यासाठी विद्यार्थ्यांना १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती सनी विनायक निम्हण यांनी दिली. यावेळी फाउंडेशनचे बिपीन मोदी, उमेश वाघ, अमित मुरकुटे, अनिकेत कपोते उपस्थित होते. मागील वर्षी या गौरव शिष्यवृत्तीद्वारे ३६८ गरजू व प्रतिभावान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आल्याचेही निम्हण यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. निम्हण म्हणाले की, इयत्ता पाचवी व आठवी मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या आणि काहीसे गुण कमी पडल्यामुळे शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उमेद न सोडता प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक व्हावे यासाठी प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात येते. डिप्लोमा, आयटीआय तसेच आर्टस, सायन्स, कॉमर्स, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, कृषी, फार्मसी, मॅनेजमेंट, लॉ, जर्नालिझम इत्यादी शाखांतील पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक निकष, नियम व अटीची पुर्तता करून गौरव शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. …अशी असेल प्रक्रीया शहरातील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार असून याची नोंदणी www.sunnynimhan.com या संकेस्थळावर १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सुरू आहे. या संकेतस्थळावर नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची दि १८, १९, २० ऑक्टोबर २०२४ ला, सोमेश्वर फाउंडेशन कार्यालय, ४४८, गोपी भवन, शैलेजा हॅाटेल लेन, शिवाजीनगर, पुणे- ५ येथे प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थांना दि २६ ऑक्टोबर २०२४ ला, बालगंधर्व रंगमंदिर , जंगली महाराज रोड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत शिष्यवृत्तीचे वाटप केले जाईल.