Pune : ‘वंदे मातरम्’च्या दीडशतकपूर्तीचा पुण्यात जागर

‘संगीत आनंदमठ’चा प्रयोग व ग्रंथ प्रकाशन
पुणे – भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत ठरलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पुण्यात विशेष उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारी (दि. ७ ) दुपारी ४ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमात ‘संगीत आनंदमठ’ नाटकाचा प्रयोग आणि ‘ध्यास वंदे मातरम्चा’ या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.
पुणे पुस्तक महोत्सव, वंदे मातरम् सार्धशती जयंती समारोह समिती आणि जन्मदा प्रतिष्ठान यांनी संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत, तर केंद्रीय नागरी वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी दिली.
या कार्यक्रमात वंदे मातरम्चे अभ्यासक मिलिंद सबनीस लिखित आणि विश्वकर्मा पब्लिकेशन्स प्रकाशित ‘ध्यास वंदे मातरम्चा’ या ग्रंथाचेही प्रकाशन होईल. ७ नोव्हेंबर १८७५ रोजी बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या लेखणीतून हे गीत अवतरले. या पवित्र भावनेला नमन करणारा हा संगीत, साहित्य आणि स्वातंत्र्याचा संगम ठरेल, अशी भावना राजेश पांडे यांनी व्यक्त केली. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पांडे यांनी केले आहे.





