युती विरुद्ध आघाडी पण मैदानात कोण ठरेना! पुण्यातील ८ पैकी ६ जागांवर चित्र अस्पष्ट…

Pune Vidhansabha Election | विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर होऊन तब्बल १० दिवस उलटले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची २९ ऑक्टोबर ही अखेरची तारीख असल्याने उमेदवारांच्या हाती अवघे ४ दिवस उरले आहेत. असं असताना देखील पुण्यातील ८ पैकी केवळ २ मतदारसंघांमधील लढतीच स्पष्ट होऊ शकल्या आहेत. आघाडी व युतीमध्ये तीन-तीन प्रमुख घटक पक्ष, एकमेकांच्या जागांवर दावा, इच्छूकांसह कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना यांमुळे जागावाटपाचं घोडं अडलं आहे.
पुण्यातील एकूण ८ जागांपैकी कोणकोणत्या ६ जागांवर जागावाटप अद्याप जाहीर झालं नाही पाहूया…
कसबा पेठ विधानसभा
काँग्रेसने गुरुवारी जाहीर केलेल्या विधानसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत रवींद्र धंगेकर यांना कसब्यातून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून मात्र या जागेवर अद्याप उमेदवार देण्यात आलेला नाही. बालेकिल्ला अशी ओळख असलेला कसबा पोटनिवडणुकीत भाजपला गमवावा लागला होता. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून खबरदारी घेण्यात येत आहे. भाजपकडून लढण्यासाठी इच्छूकांची भलीमोठी यादी आहे.
पर्वती विधानसभा | Pune Vidhansabha Election
भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या तीन टर्म आमदार माधुरी मिसाळ यांना सलग चौथ्यांदा संधी देण्यात आली आहे. पक्षाकडून येथून इतरही इच्छूक होते, मात्र पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा मिसाळ यांच्यावरच विश्वास दाखवला आहे. येथून महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताना पर्वतीमध्ये आपलाच उमेदवार असेल, असे स्पष्ट केले असले तरी उमेदवार मात्र जाहीर केला नाही. काँग्रेस व ठाकरेंची शिवसेना देखील या जागेसाठी इच्छूक आहेत.
कोथरूड विधानसभा
कोथरूड येथून मंत्री चंद्रकांत पाटील यांना भाजपने सलग दुसऱ्यांदा उमेदवारी दिली असून गुरुवारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेच्या वाट्याला ही जागा जाईल, अशी चर्चा असली तरी उमेदवारांच्या पहिल्या यादीत ठाकरेंच्या सेनेने कोथरूडला वगळले आहे.
खडकवासला विधानसभा | Pune Vidhansabha Election
महायुती व महाविकास आघाडी या दोघांचेही खडकवासला विधानसभा मतदारसंघावरून अडले आहे. आतापर्यंत झालेल्या जागावाटपात बहुतांश ठिकाणी विद्यमान आमदार असलेल्या पक्षालाच ती जागा सोडली जात असल्याचे चित्र युती व आघाडीमध्ये पाहायला मिळाले. खडकवासला येथे भाजपचे भीमराव तापकीर हे विद्यमान आमदार आहेत. असं असलं तरी या जागेवर युतीमध्ये अद्याप एकमत झालेलं नाही. महाविकास आघाडीमध्येही अशीच परिस्थिती असून तिन्ही पक्ष या जागेवर दावा करत असल्याची चर्चा आहे. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आघाडी घेत खडकवासला येथून दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश यांना संधी दिली आहे.
शिवाजीनगर विधानसभा
येथून विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे हे पुन्हा एकदा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत. पक्षाने त्यांना पहिल्याच यादीत स्थान दिले आहे. महाविकास आघाडीमध्ये या जागेवर काँग्रेसचा दावा असून पक्षातील उमेदवार द्यायचा की आयात, या पेचात जागावाटप राखडल्याचे चित्र आहे. शिरोळे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
पुणे छावणी विधानसभा | Pune Vidhansabha Election
या जागेवर देखील अद्याप दोन्ही प्रमुख आघाड्यांना उमेदवार देता आला नाही. विद्यमान आमदार असल्याने महायुतीमध्ये ही जागा भाजपच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसकडे राहणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, उमेदवार कोण, यावर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे.
‘या’ दोन जागांवर घड्याळ विरुद्ध तुतारी!
हडपसर विधानसभा
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. हडपसर येथून पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना संधी देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने यापूर्वीच विद्यमान आमदार चेतन तुपे यांना पुन्हा एकदा संधी दिली असून यामुळे हडपसरमध्ये यंदा घड्याळ विरुद्ध तुतारी असा थेट सामना होणार आहे.
वडगावशेरी विधानसभा | Pune Vidhansabha Election
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात गुरुवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने माजी आमदार बाप्पू पाठारे यांची उमेदवारी जाहीर केली. आज (शुक्रवार) अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे सुनील टिंगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. वडगावशेरीच्या जागेवरून महायुतीत भाजप व अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच निर्माण झाली होती. मात्र अखेर विद्यमान आमदार असलेल्या टिंगरे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्याने भाजपकडून इच्छूक असलेल्या मुळीक यांची निराशा झाली आहे.
दरम्यान, ही जागा देखील युती व आघाडीतील पवारांच्या पक्षाला आल्याने चुरस पाहायला मिळणार आहे.





