Mahadev Babar : येत्या काही महिन्यांवर महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठीच्या तयारीला आत्तापासून सुरूवात झाली आहे. या अनुषंगाने पुण्यातील राजकीय समीकरणे बदलताना पाहायला मिळत आहे. अनेक राजकीय घडामोड होत आहे, अशातच आता पुण्यातील हडपसर भागातून एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. हडपसर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार महादेव बाबर आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी महादेव बाबर हे इच्छूक होते. मात्र, त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तिकिट न मिळल्याने ते नाराज होते. अखेर बाबर यांनी ठाकरेसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजिद पवार पक्षात ते जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत. ठाकरेंसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे पुण्यात राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात माजी आमदार महादेव बाबर यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार महादेव बाबर हे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची जोरदार चर्चा केली जात होती. अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. 2009 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे महादेव बाबर हे या मतदार संघातून विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये भाजपने या मतदार संघातून योगेश टिळेकर यांना उमेदवारी दिली. टिळेकरही येथून निवडून आले. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे यांनी विजय मिळवला होता. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा चेतन तुपे यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली. हेही वाचा : त्रिभाषा निर्णयासंदर्भात ‘वर्षा’वर बैठक: मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती