Pune: ‘वंचित’च्या उमेदवारीचा काँग्रेसला फटका; पुन्हा मतविभाजन

पुणे – लोकसभा निवडणुकीत पुण्यात काँग्रेसला एकमेव मताधिक्य मिळालेल्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात या वेळी काँग्रेसला बहुमत मिळेल, असा कयास होता. मात्र, येथील मतदारांनी सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघात भाजपला संधी देत हा मतदारसंघ भाजपचाच असल्याचे दाखवून दिले आहे. तर २०१९ नंतर पुन्हा एकदा या मतदारसंघात काँग्रेसला वंचित बहुजन आघाडी आणि बसपच्या उमेदवारांचा फटका बसला आहे.
या मतदारसंघात सुनील कांबळे १० हजार मतांनी विजयी झाले असले, तरी वंचित बहुजन आघाडीचे नीलेश आल्हाट यांना तब्बल ८ हजार ८४९ मते मिळाली आहेत. मागील निवडणुकीत याच मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांना अवघ्या साडेपाच हजार मतांनी पराभव पत्कारावा लागला होता. त्या वेळीही वंचितच उमेदवार लक्ष्मण आरडे यांना १० हजार मते मिळाली होती. त्यामुळे सलग दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसला वंचितचा फटका बसला आहे. काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांचा हा सलग तिसरा पराभव आहे.
सलग दुसऱ्यांदा आमदार
या मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याचा मान सुनील कांबळे यांना मिळाला आहे. २००९ मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेत हडपसर आणि पर्वती विधानसभा मतदारसंघांच्या हद्दीतून या मतदारसंघाची निर्मिती झाली होती. त्यानंतर २००९ मध्ये रमेश बागवे या मतदारसंघातून विजयी झाले.
मात्र, २०१४ मध्ये दिलीप कांबळे यांनी बागवे यांचा पराभव करत भाजपकडे हा मतदारसंघ आणला. त्यानंतर २०१९ मध्ये भाजपने या मतदारसंघात उमेदवार बदलत नगरसेवक सुनील कांबळे यांना उमेदवारी दिली. त्या वेळी सुनील कांबळे यांचा निसटता पराभव झाला. मात्र, या निवडणुकीत लोकसभेचे १५ हजारांचे काँग्रेसचे मताधिक्य मागे टाकत त्यावर आणखी १० हजार मतांनी कांबळे विजयी झाले आहेत.
काँग्रेसकडून दुर्लक्ष
शहरातील इतर मतदारसंघांप्रमाणेच या मतदारसंघातही काँग्रेसचा प्रचारातील विस्कळितपणा दिसून आला. लोकसभेला मिळालेले मताधिक्य कायम राहील, असा अतिआत्मविश्वासात काँग्रेसचे राज्यातील नेते राहिल्याने बागवे यांच्या प्रचारात काही ठरविकच नेते आले. काँग्रेसचे अध्यक्ष वगळता इतर कोणताही मोठा नेता बागवे यांच्या प्रचारात उतरला नाही. याउलट भाजपने मिनी इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात उत्तरेकडील आणि दक्षिणेतील नेत्यांची फौज उतरविली. त्याचा थेट फायदा कांबळे यांना झाला.





