पुणे विद्यापीठात मुलींकडे पाहून अश्लील कृत्य करणार्याला बेड्या

पुणे : पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकणार्या मुलीसमोर अश्लील कृत्य करणार्या आरोपीला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली आहे. अनिल वसंत गायकवाड (वय २४) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रात्री जेवायला जात असलेल्या तीन मुलींकडे पाहून एका अज्ञात व्यक्तीने अश्लील कृत्य केल्याची घटना मंगळवारी (दि. २५) रात्री सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घडली होती. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेर पोलिसांनी त्याला अटक केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंग्रजी भाषा विभागाकडून केमिस्ट्री विभागाच्या दिशेने तीन तरुणी पायी जात होत्या. त्यावेळी आरोपी अनिल गायकवाड याने मुलींकडे पाहून अश्लील कृत्य केले. त्या प्रकाराची माहिती विद्यापीठातील सुरक्षारक्षक महिला कर्मचाऱ्यांनी आम्हाला देताच घटनास्थळी पाहणी केली. त्यावर विद्यापीठ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि त्याच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचणे शक्य झाले. आरोपी अनिल गायकवाड याला अटक केली असून आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. तसेच या प्रकाराबाबत आरोपीकडे चौकशी सुरू असल्याचे चतु:शृंगी पोलिसांनी सांगितले आहे.
विद्यापीठ विद्यार्थिनींच्या पाठीशी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात २५ मार्च रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास एका विकृत व्यक्तीने काही विद्यार्थिनींसमोर गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार विद्यापीठास प्राप्त झाली आहे. विद्यापीठ प्रशासन या बाबत अतिशय संवेदनशील असून, विद्यार्थिनींच्या पाठीशी आहे. तसेच या बाबत कर्तव्यात निष्काळजीपणा करणाऱ्या, चुकीचे वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्धही विद्यापीठ प्रशासन कायद्याप्रमाणे कडक कारवाई करीत आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत याबाबत विद्यापीठ सर्व ती खबरदारी घेत आहे,’असे स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने दिले आहे.



