Utaro Novel : ‘उतारो’ कादंबरीतून आश्रमशाळा, आदिवासींच्या शोषणाचे वास्तव उघड; डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ‘हीच खरी माणुसकी’
Utaro Novel : डॉ. अनिल वळवी यांच्या ‘उतारो’ कादंबरीचे पुणे विद्यापीठात प्रकाशन. आश्रमशाळा, आदिवासी समाजाचे प्रश्न आणि शोषणावर परिसंवादात चर्चा.

Utaro Novel : आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे प्रश्न, आदिवासी समाजाच्या वाट्याला येणारे सामाजिक वास्तव, शोषणाची संस्कृती आणि व्यवस्थेतील विकृती यांचे संवेदनशील चित्रण डॉ. अनिल वळवी यांच्या ‘उतारो’ कादंबरीत करण्यात आले आहे. “सद्भावना, सद्विचार ही खरे माणुसकीचे दर्शन ‘उतारो’ या कादंबरीत दिसून येते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीने डॉ. अनिल वळवी यांच्या ‘उतारो’ कादंबरीचे प्रकाशन आणि परिसंवाद आयोजित करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांनी कादंबरीच्या सामाजिक आशयावर भाष्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे यांनी केले. ‘उतारो’ ही केवळ साहित्यकृती नसून सामाजिक वास्तवाकडे संवेदनशील दृष्टीने पाहण्यास प्रवृत्त करणारी साहित्यकृती असल्याचे त्यांनी सांगितले. उपेक्षित घटकांचे प्रश्न मांडून त्यांच्याविषयी संवेदना निर्माण करण्यासाठी साहित्य हे प्रभावी माध्यम असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कादंबरीचे लेखक डॉ. अनिल वळवी यांनी आपल्या मनोगतात लेखनामागील अनुभवविश्व उलगडले. “आश्रमशाळेतील दुःख घेऊन मी २० वर्षे फिरत होतो,” असे सांगत त्यांनी आश्रमशाळांतील अनुभव आणि विद्यार्थ्यांचे वास्तव यामुळे कादंबरी लेखनाची प्रेरणा मिळाल्याचे स्पष्ट केले. ‘सांगाळी’ आणि ‘पानबारा’ या दोन गावांतील जिवंत अनुभव कादंबरीत मांडल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष अनुभव, सामाजिक वास्तव आणि त्यातून निर्माण झालेली संवेदना यांचा मेळ साधण्याचा प्रयत्न ‘उतारो’मधून केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रमुख वक्ते डॉ. विनायक पवार यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत कादंबरीच्या आशयाचे विवेचन केले. गीतकार आणि चित्रपट कवी म्हणून परिचित असलेल्या डॉ. पवार यांनी भाषणाला गाण्याची झालर देत विनोदी, मिश्कील आणि ओघवत्या शैलीत कादंबरीतील विविध मुद्दे मांडले. गंभीर सामाजिक प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत सहज आणि प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न त्यांच्या मांडणीतून दिसून आला.
डॉ. चिंतामण धिंदळे यांनी ‘उतारो’च्या विविध पैलूंचे विश्लेषण केले. कादंबरीमागील अनुभवविश्व, त्यातून पुढे येणारे सामाजिक प्रश्न आणि त्या प्रश्नांकडे पाहण्याची लेखकाची संवेदनशील दृष्टी याकडे त्यांनी लक्ष वेधले. वास्तव जीवनातील अनुभव साहित्यरूपाने मांडताना निर्माण होणारी सामाजिक जाणीव कादंबरीत प्रभावीपणे व्यक्त झाल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. देवेंद्र बहिरम यांनी आदिवासी समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांसोबतच आदिवासी खेळाडूंच्या क्रीडा क्षेत्रातील शोषणाचा मुद्दा मांडला. संधी मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदिवासी तरुणांना येणाऱ्या अडचणी आणि शोषणाच्या प्रवृत्तींवर गांभीर्याने विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे ‘उतारो’चा सामाजिक पट व्यापक आदिवासी वास्तवाशी जोडलेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे शोषण, त्यांच्या विविध समस्या आणि व्यवस्थेतील विकृती यावर भाष्य केले. उपेक्षित व वंचित घटकांच्या प्रश्नांकडे केवळ सहानुभूतीने नव्हे, तर सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने पाहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. “सद्भावना, सद्विचार ही खरे माणुसकीचे दर्शन ‘उतारो’ या कादंबरीत दिसून येते,” असे सांगत त्यांनी कादंबरीतील मानवी मूल्यांकडे लक्ष वेधले.
परिसंवादातून आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे समाज आणि व्यवस्थेने गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली. आदिवासी समाजाच्या विविध स्तरांवरील समस्या साहित्याच्या माध्यमातून समोर आणून त्यावर सामाजिक चर्चा घडवून आणण्याचे महत्त्वही यावेळी स्पष्ट झाले.
कार्यक्रमास विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. उमेश सीरसट यांनी केले, तर प्रा. डॉ. अमोघसिद्ध चेंडके यांनी आभार मानले.





