Pune University Flyover : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. दुमजली उड्डाणपुलाची बाणेर बाजूची मार्गिका येत्या चार ते पाच दिवसांत वाहतुकीसाठी खुली होणार आहे. यामुळे बाणेरकडून शिवाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांचा वेळ वाचणार असून, सेनापती बापट रस्त्यासह परिसरात होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो प्रकल्प आणि गणेशखिंड व सेनापती बापट रस्त्यावरून पाषाण, बाणेर आणि औंधकडे सुरळीत वाहतुकीसाठी पुणे विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे. या प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्या केवळ दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरू असून, ते येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण होईल. औंध-शिवाजीनगर मार्गिका या पूर्वीच ऑगस्ट २०२५ मध्ये सुरू झाली होती, आता बाणेर मार्गिका सुरू झाल्याने चौकातील ५० टक्के ताण कमी होण्याची शक्यता आहे. बाणेरची मार्गिका सुरू होत असली तरी, पाषाण बाजूच्या रॅम्पसाठी पुणेकरांना आणखी दोन ते तीन महिने वाट पाहावी लागणार आहे. जलवाहिनीची दुरुस्ती आणि इतर तांत्रिक कामांमुळे या भागाचे काम रखडले आहे, अशी माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली. दृष्टीक्षेपात प्रकल्प… एकूण लांबी- १.७ किलोमीटर (दुमजली संरचना). रचना – खालच्या स्तरावर उड्डाणपूल आणि वरच्या स्तरावर मेट्रो खर्च – सुमारे २७७ कोटी रुपये. २०२० मध्ये जुने पूल पाडून कामाला सुरुवात झाली होती, मात्र विविध कारणांनी प्रकल्पास विलंब झाला. Akluj News : माळशिरसमध्ये मोहिते-पाटील-जानकर गटाची सरशी