Pune University Flyover : विद्यापीठ चौकातील उड्डाण पुलाच्या कामात चुका; नगरसेवक सनी निम्हण यांचे गंभीर आरोप
Pune University Flyover : उड्डाणपुलाचे फोटो समोर आल्यानंतर खळबळ; नगरसेवक सनी निम्हण यांनी तांत्रिक अभ्यासाच्या आधारे कामाच्या गुणवत्तेवर घेतले आक्षेप.

Pune University Flyover – पीएमआरडीएकडून बांधण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या उड्डाणपूलाच्या कामात काही त्रुटी आणि हलगर्जीपणा दिसून येत असल्याचा आरोप करीत नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर या पुलाची काही छायाचित्रे समोर आली आहेत, यावरून कामाच्या गुणवत्तेबाबत शंका निर्माण होत असल्याचे निम्हण यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा सखोल तांत्रिक अभ्यास केल्यानंतरच अंतिम निष्कर्ष काढता येईल. कदाचित हा मोठा स्ट्रक्चरल दोष नसेलही, मात्र उघड्या डोळ्यांनी पाहताना काम करताना हलगर्जीपणा झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
स्व. अजित पवार यांना हा पूल समर्पित करण्यात आला आहे, पवार हे कामाच्या दर्जाबरोबरच अत्यंत जागरूक आणि काटेकोर होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही कामाच्या गुणवत्तेबाबत तितकाच जागरूक दृष्टिकोन आहे, असे असताना पुलाच्या कामत प्रथमदर्शी ढिसाळपणा आणि बेजबाबदारपणाचे दिसत असल्याचा आरोप निम्हण यांनी केला आहे.
या प्रकरणी जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करावी, अशी मागणी निम्हण यांनी केली आहे. आपण लोकप्रतिनिधी म्हणून सरकारचा प्रतिनिधी असलो, तरी त्याआधी पुणे शहराचा जागरूक नागरिक आणि अभियंता म्हणून ही भूमिका मांडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





