पुणे – भुसार बाजारात टाकलेल्या अनधिकृत शेडवर कारवाई केल्यानंतर पुणे बाजार समिती आणखी ऍक्शन मोडवर आली आहे. आता अनाधिकृत टपऱ्यांकडे बाजार समितीने मोर्चा वळविला आहे. मार्केट यार्डातील भुसार आणि फळ-भाजीपाला विभागातील सुमारे १० टपऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. क्रेन बोलावून पोलिसांच्या उपस्थितीत या टपऱ्या उचलून जप्त करण्यात येणार आहेत. मात्र, संचालक मंडळाने ठराव करून बाजारात काही टपऱ्या टाकण्यास परवानगी दिली आहे. त्या टपऱ्या म्हणजे बाजारात अतिक्रमणच आहे. त्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न बाजार घटकांमधून उपस्थित होत आहे. यावर प्रशासन काय भूमिका घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या पुणे बाजार समिती राज्यात विविध गैरकारभाराने चर्चेत आली आहे. मार्केट यार्डात अतिक्रमण वाढले आहे. अतिक्रमणाचा विषय अधिवेशनात उपस्थित झाला होता. यावर कारवाई करण्याचे आश्वासन पणनमंत्री जयकुमार रावळ यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर बाजार समितीकडून कारवाई करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अनधिकृत शेडवर कारवाई केल्यानंतर अतिक्रमणाच्या टपऱ्या बंद केल्या जात आहेत. ‘बाजार आवारातील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, संचालक मंडळाने ठराव करून काही टपऱ्या दिल्या आहेत. विधी मंडळातून पत्र मिळाल्यावर त्यावर असलेली माहिती पाहून या टपऱ्यांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.’ – डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे बाजार समिती