Pune : अनधिकृत फ्लेक्स, बॅनरची बजबजपुरी; येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचा कानाडोळा

येरवडा – येरवडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या तीन प्रभागांमध्ये अनधिकृत फ्लेक्स बोर्ड आणि बॅनर्स वाढत असून, क्षेत्रीय कार्यालयाचा आकाशचिन्ह विभाग कारवाई करीत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. त्यामुळे या या परिसराचे विद्रुपीकरण होत आहे.
शहर स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी पालिका आयुक्तांनी बेकायदेशीर होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर्सवर कारवाई करावी, असे आदेश देऊनही आयुक्तांच्या आदेशालाच केराची टोपली दाखविण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
प्रभाग क्रमांक १ धानोरी, कळस विश्रांतवाडी, प्रभाग क्रमांक २ नागपूर चाळ, फुलेनगर, टिंगरेनगर आणि प्रभाग क्रमांक ६ येरवडा येथील अनेक चौकांत असे फ्लेक्स लावलेले असून, अनेक राजकीय कार्यकर्ते, नेते यांच्या वाढदिवसाचे, खासगी क्लासेस, जागेची खरेदी- विक्री अशा अनेक जाहिरातीची बॅनरबाजी प्रभागात झळकत आहे. त्याकडे क्षेत्रीय कार्यालयाच्या आकाशचिन्ह विभागाचे अधिकारी कानाडोळा करत आहेत.
ही बॅनरबाजी करण्यासाठी अनेक चौकांत अनधिकृतपणे मोठमोठे बांबूंचे पाड उभे करून ठेवले असून, पूर्वी आठवडाभरात ते काढले जात होते. मात्र, आता कायमस्वरुपीच दिसत आहेत. चौकातील जागा जणू फ्लेक्स लावण्यासाठीच ठेवली आहे, असे चित्र दिसत आहे.
पर्णकुटी चौक, शाहदवल बाबा चौक, गुंजन टाॅकीज चौक, गोल्फ चौक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बदाम चौक, विश्रांतवाडी चौक, फाइव्ह नाइन चौक, छत्रपती शाहू महाराज चौक, जिजामाता भाजी मंडई, जुना जकात नाका या चौकांत अशा बॅनरची गर्दी असते. काही मोबाइल दुकानवाले मोबाइल कंपन्यांची आणि त्यांच्या दुकानाची जाहिरातबाजी करीत असून, यावर आकाशचिन्ह विभागाने तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
क्षेत्रीय कार्यालयाने दुर्लक्ष केल्यामुळेच अनधिकृत फ्लेक्समध्ये वाढ झाल्याचा आरोप करून बेकायदेशीर फ्लेक्स, बोर्ड लावणाऱ्यांवर कठोर आणि दंडात्मक कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.





