Pune: महापालिकेकडूनच अनधिकृत खोदाई

पुणे – पावसाळा सुरू झाल्याने शहरात केवळ तातडीच्या व अत्यावश्यक कामांसाठीच रस्ते खोदाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. हे काम करतानाही पथ विभागाला कल्पना देऊनच काम करण्याचे आदेश आहेत. तरीही, सिंहगड रस्त्यावर महापालिकेच्या प्रकल्प विभागाने उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या ठेकेदारास परस्परच खोदाईस परवानगी दिली असल्याचे समोर आले आहे.
हा प्रकार समोर आल्यानंतर पथ विभागाने तातडीने प्रकल्प विभागास हे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते खोदाईबाबत महापालिकेतच समन्वय नसल्याचे चित्र आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे या रस्त्यावर आधीच सातत्याने वाहतूक कोंडी होत असताना, या खोदाईने कोंडीत आणखीनच भर पडलेली आहे.
महापालिकेकडून शहरात ३० एप्रिलपासून रस्ते खोदाईस मनाई केली आहे. तर पावसाळ्यात तातडीची बाब उद्भवल्यास महावितरण, ड्रेनेज तसेच पाणीपुरवठा विभागालाच रस्ते खोदाईस मुभा दिली आहे.हे काम करताना पथ विभागाला पूर्वकल्पना देणे तसेच त्यांची मान्यता घेणे बंधनकारक आहे. मात्र, असे असतानाही उड्डाणपुलाच्या सेवा वाहिन्यांचे कारण देत प्रकल्प विभागाच्या मान्यतेने सिंहगड रस्त्यावर स्वामी विवेकानंद शाळा ते राजारामपूल चौकापर्यंत सुमारे दीडशे ते दोनशे मीटरचा रस्ता खोदण्यात आला आहे.
या सेवा वाहिन्या उड्डाणपुलाच्या असतील, तर पुलाचे काम सुरू होण्यापूर्वीच ही खोदाई होणे आवश्यक होते. मात्र, पुलाचे काम ९० टक्के पूर्ण झाल्यानंतर आता सेवावाहिन्यांचे स्थलांतरण करण्याचे कारण देत रस्ता खोदण्यात आला आहे.
महावितरण, एमएनजीएलच्या वाहिनीला धोका
ज्या ठिकाणी या सेवा वाहिन्यांसाठी खोदाई करण्यात येत आहे. त्याच जागेवर जमिनीखाली महावितरण तसेच एमएनजीएलच्या उच्च दाब क्षमतेच्या मोठ्या केबल टाकण्यात आलेल्या आहेत. भविष्यात त्या वाहिन्यांमध्ये काही अडचणी आल्यास या पुलासाठीच्या सेवा वाहिन्यांचे नुकसान होणार आहे, त्यामुळे हे काम नक्की कशाचे आहे, याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.
तर, या कामासाठीचा जेसीबी तसेच राडारोडा भरण्याचा ट्रक रस्त्यावरच लावला जात असल्याने वाहनांसाठी केवळ एकच लेन रस्ता मिळत असून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.





