Pune: मांजरी मतदान केंद्रावर एकाच नावाचे दोन मतदार

मांजरी – एकच नाव असलेल्या दोन महिला मतदार दोघींचा पत्ताही एकच. निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र किंवा फोटो व्होटर स्लिप यापैकी एक ओळखीचा पुरावा दोन्ही मतदारांकडे.., मतदानाला आल्यावर आपले मतदान आधीच झाल्याचे समजते तेव्हा आपल्यालाही हा हक्क मिळावा ही दुसऱ्या महिला मतदाराची मागणी पूर्ण करण्यात आली.
हडपसर विधानसभा मतदारसंघात मांजरी बुद्रुक येथील मतदान केंद्रावर एकच नाव असलेले दोन मतदार हजर झाल्याच्या दोन घटना घडल्या. या मतदान केंद्रामध्ये शेजारील दोन खोल्यांमध्ये प्रत्येकी एका मतदाराला या अनुभवाला सामोरे जावे लागले. मतदानाला आल्यानंतर आपले मतदान झाले असल्याचे समजल्यावर तेच नाव असलेल्या दुसऱ्या मतदारानेही आपल्या हक्काची मागणी केली. तेव्हा पुरुष मतदाराला आपला मतदानाचा हक्क मिळालाच नाही.
विजय निवृत्ती घुले असे त्या मतदाराचे नाव आहे. याच नावाच्या दुसऱ्या मतदाराने सकाळीच लवकर आपला मतदानाचा हक्क बजावला होता. तर संगीता बाळासाहेब घुले या नावाच्या दोन महिला मतदार एकाच केंद्रावर होत्या. त्यापैकी एक महिला सकाळीच मतदान करून गेल्या. तर, दुपारी मतदान केंद्रावर आलेल्या संगीता बाळासाहेब घुले यांना तुमच्या नावाचे मतदान आधीच झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावर त्यांनी वारंवार विनंती केल्यानंतर त्यांना मतदानाचा हक्क मिळाला.
घरातील मतांची विभागणी…
मांजरी, केशवनगर, हडपसर, सय्यद नगर आणि काळेपडळ मतदार यादीतील घोळाचा फटका अनेक मतदारांना बसला. एकाच घरातील चार मतांची विभागणी झाल्याने काही कुटुंबीयांना मनस्ताप भोगावा लागला.





