पुणे – पुणे शहरात किरकोळ कारणांवरून दोन खून झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एक घटना आंबेगाव पठार येथील साई सिध्दी चौकामध्ये घडली असून दुसरी घटना फुरसुंगी परिसरात घडली आहे. साई सिध्दी चौकात पान टपरीवर झालेल्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. उपचारादरम्यान शनिवारी त्याचा मृत्यू झाला. तर फुरसुंगी येथे वेफर्स आणायला दुकानात जात असताना झालेल्या किरकोळ वादातून परप्रांतीय कामगाराचा खून करण्यात आला. या घटनांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात मृत तरुणाचे नाव आर्यन साळवे (वय २५, रा. सटाणा, नाशिक) असे असून, धैर्यशील मोरे (वय ३०, रा. साई सिध्दी चौक) याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या माहितीनुसार, आर्यन साळवे १८ दिवसांपूर्वी मामाच्या घरी राहण्यासाठी आंबेगाव पठार येथे आला होता. तो एका सलूनमध्ये काम करत होता. दरम्यान, शुक्रवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास तो पान खाण्यासाठी चौकातील टपरीवर गेला होता. त्यावेळी आरोपी धैर्यशील मोरे तिथे सिगारेट पित उभा होता. धैर्यशीलने आर्यनकडे पाहिल्याचा जाब विचारून वाद सुरू केला. वाद विकोपाला गेल्यानंतर दोघांमध्ये मारामारी झाली. त्या दरम्यान धैर्यशीलने धारदार शस्त्राने आर्यनवर सपासप वार केले. आर्यनने हल्ला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याची बोटे तुटली. गंभीर जखमी झालेल्या आर्यनला नागरिकांनी रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक प्रियंका निकम करत आहेत. फुरसुंगीमध्ये लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण फुरसुंगी येथे किरकोळ वादातून झालेल्या हल्ल्यात रामलोचन हुसेनी कोरी (वय ४६, रा. उत्तर प्रदेश) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मृताचा भाचा संतकुमार कोरी (वय २५, रा. उरळी देवाची, मुळगाव उत्तर प्रदेश) यांच्या फिर्यादीवरून देवेस धुर्वे (वय २२), प्रेमलाल कुमरे (वय २१, रा. फुरसुंगी) आणि इतर ४-५ जणांविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, रामलोचन हे दुकानात वेफर्स आणण्यासाठी गेले असताना रस्त्यावर त्यांचा देवेस धुर्वे याच्याशी धक्का लागला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपास गेल्यानंतर देवेसने लाकडी दांडक्याने रामलोचन यांच्या डोक्यावर जोरदार मारहाण केली. त्यानंतर इतर साथीदारांनीही लाथाबुक्यांनी आणि दांडक्यांनी हल्ला चढवून त्यांचा खून केला. त्यानंतर आरोपी व त्याचे साथीदार संतकुमार कोरी यांच्या खोलीत घुसले. त्यांनी त्याला शिवीगाळ करत रूममध्ये राहणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला देखील हातावर आणि गुडघ्यावर दांडक्याने मारहाण करून जखमी केले. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त रामकुमार शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोरे, तसेच पोलीस निरीक्षक राजेश खांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.