Pune: आणखी दोघांना झिकाची लागण एकूण ६ रुग्ण; दोन गर्भवतींचा समावेश

पुणे – डेंग्यूपाठोपाठा आता झिका आजाराने डोकेदुखी वाढली असून, आज नवीन दोन जणांना झिकाची लागण झाल्याचे तपासणी अहवालातून समोर आले. त्यामुळे पुण्यातील झिका रूग्णांची संख्या सहावर पोहचली आहे. त्यामध्ये दोन गर्भवती मातांचा समावेश आहे.
वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील एरंडवणा परिसरात दोन झिकाचे रूग्ण सापडताच महापालिका आरोग्य विभाग अलर्ट झाला. धक्कादायक म्हणजे या दोन्ही रूग्णांची परदेशातून आल्याची हिस्ट्री नाही, त्यामुळे परिसरात सर्वेक्षण, तपासणीला गती देण्यात आली. एरंडवणा परिसरात दोन रूग्ण सापडल्यानंतर येथील परिसरातील नागरिकांची तपासणी करण्यात आली.
त्यामध्ये गर्भवती मातांची चाचणी केली असता, दोन गर्भवतींना झिकाची लागण झाल्याचे समोर आले. त्यातील एक महिला २२ आठवड्यांची गर्भवती असून, त्यांची एॅनोलमली स्कॅन करण्यात आले आहे. त्याचा अहवाल नाॅर्मल आला असून, दुसरी गर्भवती माता 16 आठवड्यांची आहे. या दोन्ही महिलांवर डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार व तपासणी सुरू आहे.
गेल्या 24 तासांत दोन रूग्ण सापडले…
गेल्या 24 तासांत एरंडवणा परिसरात एक गर्भवती माता आणि कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयांतर्गत डहाणूकर काॅलनी परिसरात राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेला झिकाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामध्ये गर्भवती मातेला कोणतीही लक्षणे नाही. तर 45 वर्षीय महिलेला ताप, सांधेदुखी आणि लाल चट्टे अशी लक्षणे आहेत, अशी माहिती सहाय्यक आरोग्य प्रमुख डाॅ. राजेश दिघे यांनी दिली.





