पुणे : वाहतुकीचे नियोजन ‘ट्रायल’मध्येही फसले

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (6 मार्च) पुण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिसांकडून ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त तैनात आहे. मोदी शहरात ज्या मार्गाने प्रवास करणार आहेत. त्यामार्गावर शनिवारी “ट्रायल’ घेण्यात आली. मात्र या “ट्रायल’चा परिणाम शहरातील वाहतुकीवर झाला असून, यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.
शनिवारी शहरात पोलिसांनी रविवारच्या नियोजित वाहतुकीची ट्रायल घेतली. त्यामुळे कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन आदी भागातील रस्ते काही वेळासाठी बंद ठेवले होते. तर या भागांतील सिग्नल देखील बंद ठेवत वाहतूक पोलिस नियमन करत होते. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. भरदुपारी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
मेहंदळे गॅरेज चौक, नळस्टॉप चौक, एसएनडीटी महाविद्यालय चौक, पौड रस्ता, पौड फाटा, वनाझ कॉर्नर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे विद्यापीठ चौक,सेनापती बापट रस्ता, बालगंधर्व चौक, जंगली महाराज रस्ता, पुणे महानगरपालिकेचा रस्ता, शिवाजीनगर चौक, शास्त्री रस्ता, या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. तर नदीपात्र, कर्वे नगर, कोथरूड, डेक्कन परिसरातील अंतर्गत रस्ते देखील “ब्लॉक’ झाले होते.





