Pune Traffic Updates : पुणेकरहो लक्ष द्या! रमजान ईदनिमित्त शहराच्या वाहतुकीत मोठे बदल; पाहा पर्यायी मार्ग
Pune Traffic Updates : शनिवारी सकाळी ६ ते ११:३० वाजेपर्यंत लष्कर भागातील प्रमुख चौक राहतील बंद; वाहनचालकांनी 'या' सूचनांचे पालन करावे.

Pune Traffic Updates – रमजान ईदनिमित्त उद्या, शनिवारी (२१ मार्च) लष्कर भागात सकाळी सहा ते साडेअकरा वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. गोळीबार मैदान चौकातील ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी मोठी गर्दी होते. यामुळे केलेला बदल लक्षात घेऊन वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे. गोळीबार मैदान चौकातून स्वारगेटकडे जाणारी जड वाहने पुणे-सोलापूर रस्त्यावरील भैरोबा नाला चौकातून वानवडी, लुल्लानगर चौकातून इच्छितस्थळी जातील.
तसेच अन्य वाहनांनी भैरोबा नाला चौकातून एम्प्रेस गार्डन, घोरपडीमार्गे इच्छितस्थळी जावे. मम्मादेवी चौक ते गोळीबार चौक दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद असेल. सीडीओ चैाकातून गोळीबार मैदान चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी खटाव बंगला चौकातून नेपियर रस्तामार्गे बिशप स्कूल या रस्त्याचा वापर करावा. खटाव बंगला चौकातून उजवीकडे वळण्यास तात्पुरत्या स्वरुपात परवानगी दिली आहे.
स्वारगेटकडून सोलापूर रस्त्याने हडपसरकडे जाणाऱ्या वाहनांनी शंकशेठ रस्त्यावरील चिमणराव ढोले पाटील चौकातून (सेव्हन लव्हज चौक) गुलटेकडी मार्गे सॅलिसबरी पार्क चौकाकडे जावे. खटाव बंगला चौकातून नेपियर रस्त्याने सोलापूर रस्त्याकडे जावे. खटाव बंगला चौकातून लुल्लानगरमार्गे वाहने सोलापूर रस्त्याकडे जातील. सोलापूर बाजार पोलीस चौकी ते गोळीबार मैदान चौकादरम्यानची वाहतूक बंद असेल. लुल्लानगर चौकातून गोळीबार मैदानाकडे जड वाहनांना बंदी आहे्.





