Pune Traffic Update – श्रीराम नवमीनिमित्त बाजीराव रोड, लष्कर भागात मिरवणुका निघतात. त्यामुळे उद्या गुरुवारी (दि.२६) या भागातील वाहतुकीत दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत म्हणजेच मिरवणुका संपेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे. बाजीराव रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्यामुळे पुरम चौकातून बाजीराव रोडवरून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना आवश्यकतेनुसार प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्या वेळी वाहनचालकांनी पुरम चौकातून डावीकडे वळून टिळक रस्त्याने, अलका टॉकीज चौक, खंडोजीबाबा चौकातून पुढे जावे, तसेच लष्कर परिसरात देखील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे वाय जंक्शनवरून एमजी रोडकडे जाणारी वाहतूक ही वाय जंक्शन येथे बंद करण्यात येणार आहे. मिरवणुका ट्रायलक हॉटेलपासून पुढे १५ ऑगस्ट चौकाच्या पुढे गेल्यानंतर एम.जी रस्त्यावरील वाहतूक १५ ऑगस्ट चौकापासून उजवीकडे व डावीकडे वळविण्यात येणार आहे. महंमद रफी चौकाच्या पुढे मिरवणुका गेल्यानंतर एम.जी रस्त्यावरील वाहतूक महंमद रफी चौकापासून उजवीकडे ईस्ट स्ट्रीट रोडकडे वळविण्यात येणार आहे. या चौकातून मिरवणुका पुढे गेल्या, की कोहीनूर हॉटेलपासून एम.जी रोडवर येणारी वाहतूक बंद करून ती भोपळा चौक येथून कुरेशी मस्जिद, तसेच सेंटर स्ट्रीट मार्गावर वळविली जाईल. होल्गा चौकाकडून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक ही मिरवणुकीच्या मार्गानुसार बंद करण्यात येणार आहे. ही वाहतूक सरळ पुढे ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येणार आहे.