Garbage Burning – जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गालगत काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा जाळण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे परिसरातील वातावरण प्रदूषित होत आहे. कचरा जाळण्यामुळे निर्माण होणाऱ्या दाट धुराचा फटका स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर तर बसतच आहे, शिवाय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पर्यावरण आणि सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कामशेत परिसरासह महामार्गालगतच्या अनेक भागांमध्ये रात्रीच्या वेळी कचरा जाळण्याचे प्रकार अधिक प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः निर्जन किंवा कमी वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडत असल्याची माहिती समोर येत आहे. या ठिकाणी विविध प्रकारचा कचरा, प्लास्टिक, रबर तसेच औद्योगिक अवशेष जाळले जात असल्याने वातावरणात विषारी धूर पसरतो. या धुराचा सर्वाधिक परिणाम स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. सतत धुराच्या संपर्कात राहिल्यामुळे श्वसनाचे त्रास, घशात खवखव, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी अशा तक्रारी वाढत असल्याचे दिसून येत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीच श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींना याचा अधिक त्रास होत आहे. महामार्गावरील वाहतुकीवरही या प्रकाराचा गंभीर परिणाम होत आहे. पुणे – मुंबई जुना महामार्ग कचरा जाळल्याने निर्माण होणारा धूर काही वेळा इतका दाट असतो की वाहनचालकांना पुढील रस्ता स्पष्ट दिसेनासा होतो. त्यामुळे दृश्यमानता कमी होऊन वाहन चालवताना अडचणी निर्माण होतात. विशेषतः रात्रीच्या वेळी हा धोका अधिक वाढतो. वेगाने धावणाऱ्या वाहनांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरू शकते आणि अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पर्यावरणाचा होतोय घात कचरा जाळताना वातावरणात कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड आणि इतर विषारी वायू मोठ्या प्रमाणात सोडले जातात. हे वायू हवामान बदलाला चालना देण्याबरोबरच स्थानिक पातळीवर हवेची गुणवत्ता खालावण्यास कारणीभूत ठरतात. दीर्घकाळ अशा प्रदूषणाचा परिणाम माती, पाणी आणि जैवविविधतेवरही होऊ शकतो. वाहनचालकांना सहन करावा लागतोय त्रास अनेक वाहनचालकांनी धुरामुळे वाहन चालवताना अडथळे येत असल्याची नोंद केली आहे. काही ठिकाणी अचानक धुराचा पडदा निर्माण झाल्याने वाहनांचा वेग कमी करावा लागतो. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो. ही परिस्थिती अपघातांना आमंत्रण देणारी ठरत आहे. कचरा व्यवस्थापन आवश्यक कचरा व्यवस्थापनाच्या योग्य पद्धतींचा अवलंब करणे ही काळाची गरज बनली आहे. कचऱ्याचे वर्गीकरण, पुनर्वापर (रिसायकलिंग) आणि सुरक्षित विल्हेवाट लावणे या उपाययोजना प्रभावीपणे राबविल्यास अशा प्रकारांना आळा घालता येऊ शकतो. भंगार व्यवसायिकांसाठीही पर्यावरणपूरक पद्धती विकसित करणे आवश्यक आहे.