पुणे : वाहतूक नियम आता अभ्यासक्रमात

पुणे : रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. येत्या काळात वाहतुकीच्या नियमांबाबत शालेय आणि विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रमातून प्रबोधन करण्यात येणार आहे. परिणामी, वाहतूक नियमांबाबत जनजागृती होण्यास मदत होणार आहे.
जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे आदी उपस्थित होते. यावेळी ब्लुम्बर्ग संस्थेच्या स्वाती शिंदे, आयडीयल इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटचे गोविंद पानसरे, सेफ रोड फाऊंडेशनच्या समायरा, प्रशांत काकडे यांनी सादरीकरणाद्वारे जनजागृती उपक्रमांची माहिती दिली. वाहतूक नियमांबाबत नववी आणि दहावी इयत्तांच्या बालभारती पाठ्यपुस्तकाच्या माहिती देण्यात येणार असून, 5 विद्यापीठात देखील याबाबतचा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे ससाणे यांनी सांगितले.
39 नवे ब्लॅक स्पॉट
पुणे ग्रामीण पोलिसांनी एकात्मिक रस्ते अपघात माहिती प्रणालीचा उपयोग करत राज्यात 39 नवे ब्लॅक स्पॉट शोधले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तर या प्रणालीचे सादरीकरण राष्ट्रीय सूचना केंद्राचे देशपांडे यांनी केले.





