Pune: वाहतूक पोलिसांनी दुचाकी केली टोईंग; पती-पत्नीचा भर रस्त्यात राडा

पुणे – दुचाकीवर वाहतूक पोलिसांनी टोईंग कारवाई केली म्हणून पती-पत्नीने डेक्कन वाहतूक विभागाच्या कार्यालयात आणि सार्वजनिक रस्त्यावर मोठा गोंधळ घातला. त्यांनी काही काळ रस्ता अडवून वाहतूक कोंडीही केली. पोलीस कर्मचारी समजवण्यास गेले असता त्यांनाच शिवीगाळ करुन नोकरी घालवण्याची धमकी देण्यात आली.
ही घटना गुरुवारी सायंकाळी डेक्कन वाहतूक विभागात घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद डोंगरे यांनी दिलेल्या तक्रारीनूसार ॲड. गणेश कोंडीभाऊ सहाणे आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पती-पत्नीने दोघांच्याही दुचाकी नो पार्किंगमध्ये लावल्या होत्या. डेक्कन वाहतूक विभागातील टेम्पोने त्या टोईंग करुन कार्यालयात आणल्या. दोघेही तेथे आल्यावर त्यांना दंड भरण्यास सांगण्यात आले. मात्र दोघांनीही दंड भरण्यास नकार देत कार्यालयाच्या आवारता गोंधळ घातला. तेथून मुख्य रस्त्यावर येऊन वाहने अडवत तेथेही गोंधळ घातला.
वाहतूक कोंडी झाल्याने पोलीस कर्मचारी त्यांना समजवण्यास गेले, मात्र त्यांनी पोलिसांनाच उलट धमकी दिली. दोघांचीही पोलिसांना शंका आल्याने त्यांनी ॲड.गणेश सहाणे यांच्या गाडीचा नंबर ॲपमध्ये टाकून बघितला. तेव्हा हा नंबर बनावट असल्याचे लक्षात आले. यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली.
बँकेचे कर्ज थकवले म्हणून बदलला नंबर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार ॲड. सहाणे यांनी दुचाकी कर्जावर घेतली आहे. त्याचे काही हप्ते थकले आहेत. यामुळे बँकेच्या वसुली पथकाने गाडी उचलून नेऊ नये म्हणून गाडीच्या दोन्ही नंबर प्लेट बनावट टाकल्या आहेत. याबरोबरच वाहतूक पोलिसांचा दंड बसू नये म्हणूनही बनावट नंबर प्लेट टाकली आहे. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २२१, ३३६(३), ३३८, ३४०(२), ३५१(१), ३(५) कलमानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे करत आहेत.





