पुणे : लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन
पुणे(प्रतिनिधी) – पुणे शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येऊ नये. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यासह सामान्य मेटाकुटीला आले आहेत. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून याबाबत पुणे शहर व्यापारी महासंघाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोमवारी निवेदन देण्यात आले.
पुणे व्यापारी महासंघाचे तीस हजार व्यापारी सभासद आहेत. शहरातील व्यापार, दुकाने गेल्या 120 दिवसांपासून बंद आहेत. दुकाने बंद ठेवणे हा करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्याचा एकमेव मार्ग नाही. व्यापाऱ्यांसह कामगार वर्ग तसेच सामान्य आर्थिक संकटात आहेत. वीज बिल, दुकान भाडे, कर्जाचे हप्ते, घरखर्चाची रक्कम दरमहा भरावी लागत आहे. शहरात करोनाचा संसर्ग वाढण्यास नेमके कोणते कारण आहे, हे अद्याप निश्चित झाले नाही. व्यापाऱ्यांची सहनशीलतेची मर्यादा संपलेली आहे. यापुढील काळात लॉकडाऊन लागू झाल्यास व्यापारी बांधव आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
सामाजिक अंतर न पाळणे, गर्दी करणे, मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई जरूर करावी. मात्र, केवळ व्यापार, बंद ठेऊन संसर्ग रोखता येणार नाही, असे निवेदनात म्हटल्याचे महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया यांनी सांगितले.





