Pune : आज घरोघरी हरितालिका पूजन; कशी करावी पूजा?

पुणे – गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरितालिका पूजन करण्याची परंपरा आहे. विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि ऐश्वर्य व सुख-समृद्धीसाठी हे व्रत करतात. यावर्षी हे व्रत मंगळवारी (दि. २६) होणार आहे. या दिवशी घरोघरी महिला हरितालिकांच्या प्रतिमेचे पूजन करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणार आहेत.
यावर्षी हरतालिकेच्या पूजेचा सर्वाधिक शुभकाळ पहाटे ५ वाजून ५६ मिनिटांपासून सकाळी ८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत आहे. हा कालावधी २ तास ३५ मिनिटांचा असून, याच काळात देवी पार्वती आणि भगवान शिवाची आराधना केली जाणे फलदायी मानले जाते.
अशी करावी पूजा
हरितालिका पूजनाच्या दिवशी देवी गौरीसह शिवलिंगाची पूजा केली जाते. महिलांनी स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावे. रांगोळी काढून आणि केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे.
उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावर सुपारीरूपी गणपती मांडावा. समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे. सर्वप्रथम स्वत:ला हळद-कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावे.
हळद-कुंकू, अक्षता वाहून मनोभावे नमस्कार करावा. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी. पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी.
सर्वप्रथम गणपतीची आणि नंतर महादेव आणि सखी-पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी. पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे. दिवसभर महिलांनी कडक उपवास करावा. शक्य नसल्यास फलाहार करावा, असा संकेत आहे.





