Pune: अवजड वाहनांच्या चुकीमुळे दोन अपघातात तिघांचा मृत्यू

पुणे – शहरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. हे दोन्ही अपघात अवजड वाहनांच्या चुकीमुळे झाले. वारजे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अपघाताच्या गुन्ह्यात बाबू लालू मेघावत (19) आणि शितीया शंकर नैनावत (28) या दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रक चालक संतोष शंकर भोसले (43, रा. कराड, सातारा) याला अटक करण्यात आले आहे. तर टेम्पो चालक ललितकुमार वैष्णव (24, रा. बावधान) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैष्णव याने चांदणी चौकाकडे जाणाऱ्या लेनवर डुक्करखिंड येथे त्याचा टेम्पो उभा केला होता. या टेम्पोला बाबू आणि शितीया यांची दुचाकी धडकल्याने ते रस्त्यावर फेकले गेले. त्यावेळी त्यांच्या अंगावरुन भोसले याचा ट्रक गेला. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक तृप्ती पाटील करत आहेत.
दुसरीकडे लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अपघाताच्या गुन्ह्यात समीर भुजबळ (33,रा. तळेगाव ढमढेरे) याचा मृत्यू झाला आहे. समीर भुजबळ आणि भारत येवले हे दोघे वेगवेगळ्या दुचाकीवरुन जात असताना एक ट्रक त्यांच्या दुचाकीला कट मारुन गेला. यामुळे दोन्ही दुचाकी एकमेकांत अडकून दोघेही गंभीर जखमी झाले. यामध्ये समीरचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुहास पाटील करत आहेत.





