Pune: पर्वती विधानसभा निवडणुकीत एकाच नावाचे तीन उमेदवार

बिबवेवाडी – पर्वती विधानसभा मतदारसंघ निवडणुकीकरिता दि. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांचे २२ नामनिर्देशन पत्र दाखल झाली. त्यामध्ये अवैध असून २० नामनिर्देशन पत्र वैध स्वरूपात प्राप्त झाले, अशी माहिती, पर्वती निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
आजपर्यंत आलेल्या अर्जाची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन दि. ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, पर्वती विधानसभा अंतर्गत दाखल झालेल्या नामनिर्देशन अर्जामध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तीन उमेदवार एकाच नावाने समोर आल्याचे नामनिर्देश अर्जातील यादीनुसार दिसून आले.
एकाच नावाचे तीन उमेदवार निवडणुकीला सामोरे जात असल्याने मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडी अशी समोरासमोर लढत असताना महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार अश्विनी नितीन कदम यांच्या नावाला साधर्म्य असलेल्या दोन उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचा पिपाणी या चिन्हाने अनेकांचा खेळ बिघडवला होता. तिन्ही उमेदवारांचे नाव आणि आडनावही एकच असल्याने मतदारांमध्ये गोंधळ होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे.





