Pune : पुण्यातील काश्मिरी मुलांना धमक्यांचे मेसेज

पुणे : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पुण्यात शिकत असलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन निषेध केला. या हल्ल्यानंतर काही काश्मिरी विद्यार्थ्यांना समाजमाध्यमांवर धमक्यांचे मेसेज येत असून, त्यांच्या सुरक्षेसाठी ते सोमवारी पोलीस आयुक्तांना भेटणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
विद्यार्थ्यांपैकी एक असलेले आकीब भट म्हणाले, की पहलगाममध्ये झालेली घटना प्रचंड दुर्दैवी आहे. या हल्ल्यानंतर काहींकडून स्थानिक काश्मिरी नागरिकांवर दहशतवाद्यांना मदत करण्याचा आरोप झाला. मात्र, या घटनेनंतर बहुतांश काश्मिरी नागरिकांनी या घटनेचा निषेध करून अडकलेल्या पर्यटकांची मदत केली. मात्र, तरीही देशातील काही ठिकाणी काश्मिरी विद्यार्थ्यांना हिंसाचाराचा सामना करावा लागला.
या घटनेनंतर समाजमाध्यमांवर धार्मिक ध्रुवीकरण वाढत आहे. त्यामुळे पुण्यात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी काश्मिरला गेलेल्या विद्यार्थ्यांमधील काही माघारी येण्यास घाबरत आहेत. त्यामुळे आम्ही पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आमच्या सुरक्षेसाठी एक नोडल अधिकारी नेमण्याची मागणी करणार आहोत.
गेल्या २० वर्षांपासून पुण्यात रहिवाशी असलेले मंजूर बशीर म्हणाले, की अंदाजानुसार पुण्यात सुमारे १००० विद्यार्थी शहरातील विविध संस्थांमध्ये शिकतात. त्यातील २०० ते २५० विद्यार्थी उन्हाळी सुट्ट्यांसाठी काश्मिरला माघारी गेले आहेत. त्यांच्यामध्ये घबराटीचे वातावरण असून, ते पुन्हा पुण्यात येण्यासाठी तयार नाहीत.
काश्मीरमधील तरुणांना संधी मिळण्याची आवश्यकता असून, त्यासाठी त्यांना काश्मीरमधून बाहेर यावे लागेल. त्यासाठी त्यांना बाहेरील राज्यात सुरक्षित वाटणं गरजेचे आहे. त्यांना संधी मिळाल्यानंतरचं काश्मीरचा विकास होईल आणि काश्मीरमध्ये शांतता नांदेल. या वेळी या विद्यार्थ्यांसोबत अरिहंतचे शैलेश पगारिया, सरहद संस्थेचे लेशपाल जवळगे आणि इतर काही विद्यार्थी उपस्थित होते.




