पुणे : महिन्याआधीच रेल्वे गाड्यांना हजारोंचे वेटिंग

साहेब विशेष गाडी कधी सोडा की; प्रवाशांची मागणी
पुणे – रेल्वेचा प्रवास सुरक्षित आणि सुखकारक, त्यामुळे दिवाळीला बाहेरगावी जाणाऱ्यां प्रवाशांची रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी होते. मात्र, यंदाही एक महिना आधीच लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे बुकिंग फुल्ल झाले असून, वेटिंग लिस्ट शेकडोत नव्हे तर हजारात आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा विशेष रेल्वे गाड्यांची आहे.
नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात राहणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. दिवाळीला हे सर्व नागरिक त्यांच्या मूळ गावी जातात. त्यामध्ये प्रामुख्याने रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे दिवाळीच्या दोन ते तीन महिने आधीपासून या रेल्वेचे बुकिंग सुरू होते. यंदाही एक महिना अधीच दिवाळीच्या काळात पुण्यातून वेगवेगळ्या शहरात जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. काही गाड्यांना तर दहा ते अकरा हजारांचे वेटिंग दाखवत आहे. त्यामुळे नागरिकांना गावी कसे जायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दानापूरला सर्वाधिक मागणी
पुण्यातून दानापूरला जाणाऱ्या रेल्वे गाडीला सर्वाधिक मागणी असते. मात्र, आज या गाडीला जवळपास 11 हजारांचे वेटिंग दिसून येत आहे. तर, नागपूरला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना सात हजारांचे वेटिंग आहे. इंदोरसाठी पाच हजार, नांदेडसाठी तीन हजार, कोलकत्ता आणि गोरखपूरसाठी 4 हजार, लखनऊला दीड हजारांचे वेटिंग आहे. त्यामुळे नागरिकांकडून दिवाळीच्या काळात विशेष गाड्या सोडण्याची मागणी केली जात होती.
हजारो वेटिंग, दिवाळीला घरी जायचे कसे
दिवाळीला गावी जायचे, ऑनलाईन बुकिंग आम्हाला येत नाही. इथे आलो तर कितीतरी हजार वेटिंग आहे, असे सांगितले. बसने जायचे म्हटले तर पैसे खूप जातात, “साहेब आता आम्ही जायचे कसे, काही विशेष गाड्या असतील तर गावाला जाता येईल, अशी प्रतिक्रिया रेल्वे स्थानकावर तिकिट काढण्यासाठी आलेल्या नागरिकाने दिली. दरम्यान, दररोज शेकडो व्यक्ती तिकिट आणि विशेष गाड्यांची विचारपूस करण्यासाठी येत असतात.
दिवाळीमध्ये रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी असते. त्यामुळे गर्दीच्या मार्गावर विशेष गाड्या सोडण्याचा प्रस्ताव रेल्वे मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. परवानगी मिळाल्यानंतर विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात येईल.
– डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे विभाग





