पुणे : सध्या चौथ्या लाटेचा धोका नाही

पुणे- करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव कमी झाला असतानाच त्याच्या “स्टेल्थ’ या नव्या प्रकाराने पुन्हा एकदा जगात भितीचे वातावरण निर्माण केले आहे.
भारतात लसीकरणाचे प्रमाण चांगले आहे आणि ओमायक्रॉनचा यशस्वीपणे मुकाबला सुरू आहे असे असतानाही या नव्या व्हेरियंटबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. काही देशांमध्ये “स्टेल्थ’ने चांगलेच हातपाय पसरले असल्यामुळे रूग्णसंख्येत अचानक वाढ होताना दिसते आहे.
तर अमेरिकेत नव्याने आढळणाऱ्या रूग्णांपैकी 33 टक्के रुग्णांमध्ये याच घातक व्हेरिएंटची लक्षणे आढळून आली असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगली जात असून, मध्यंतरी केंद्र सरकारनेही राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना देणारे पत्र पाठवले होते. या व्हेरिएंटचा वाढता प्रादुर्भाव बघता महाराष्ट्रही सतर्कता बाळगली जात आहे.
अन्य देशांत प्रादुर्भाव झालेला स्टेल्थ व्हेरिएंट भारतात चौथी लाट आणू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर देशात सतर्कता बाळगली जात आहे. मात्र, महाराष्ट्राला सध्या तरी करोनाच्या चौथ्या लाटेचा धोका नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ओमायक्रॉनमुळेच करोना संसर्गात वाढ होत असल्याचे आढळून येते आहे. आपल्याकडची तिसरी लाट ओमायक्रॉनची होती त्यामुळे आपल्याला इतक्यात काही धोका नाही. मात्र जर विषाणूमध्ये काही ठळक बदल झाले तर धोका संभवू शकतो.
– डॉ. प्रदीप आवटे, साथरोग विभाग प्रमुख, महाराष्ट्र राज्य





