Pune : ढोल-ताशा सरावासाठी मैदाने नाहीत

पुणे : उत्सवकाळात ढोल-ताशा पथकांनी वादन सराव कुठे करायचा, हा मोठा प्रश्न आहे. सरावासाठी पालिकेची मैदाने तात्पुरत्या स्वरूपात द्यावीत, अशी मागणी होत असली तरी पालिका आयुक्त नवल किशोर राम त्यास तयार नाहीत. खेळाची मैदाने देण्याऐवजी अन्य जागा वापरण्याचा विचार आहे. तसेच जागा देण्यापूर्वी संयुक्त पाहणी करूनच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
यंदा गणेशोत्सव ऑगस्टच्या अखेरीस आहे. शहरातील गणेशोत्सवाची ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरा लक्षात घेऊन अनेक पथकांनी वादन सराव सुरू केला आहे. हे सराव नदीपात्रालगतच्या मोकळ्या जागांमध्ये, घाटांवर तसेच मोकळ्या , बंदिस्त जागांवर सुरू आहेत. गेल्या काही वर्षांपासून पालिकेच्या सणस मैदान, पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम परिसरात काही पथके सराव करत आहेत.
यंदा क्रीडा विभागाने सुरुवातीपासूनच खबरदारी घेत सरावासाठी शेड उभारण्याचे काम थांबवले आहे. तसेच वादन सरावासाठी आलेले बारा प्रस्ताव नामंजूर केले आहेत. सणस मैदानासाठी ६, नेहरू स्टेडियमसाठी ४, सप्तगिरी बालाजी क्रीडांगण, घोरपडीसाठी १, हडपसर हँडबॉल स्टेडियम, माळवाडीसाठी एक असे एकूण बारा प्रस्ताव आले होते.
सांस्कृतिक विभागानेही गणेश कला क्रीडा मंच परिसरात परवानगी देण्यास असमर्थता दर्शविली आहे. यामुळे भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवारी पालिका आयुक्तांची भेट घेऊन जागा देण्याची मागणी केली.
‘मैदानांवर परवानगी दिली जाणार नाही. कोणी ठरावीक जागेचा आग्रह धरत असेल, तर त्यांचा उद्देश तपासला जाईल. मात्र, शहराचे सांस्कृतिक महत्त्व, गणेशोत्सवातील ढोल पथकांचे योगदान लक्षात घेऊन सरावासाठी जागा देण्याचा प्रयत्न आहे. सरावाचा कोणाला त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.’ – नवल किशोर राम, महापालिका आयुक्त





