Pune: ओंकारेश्वर मंदिरात चोरी; दानपेटी फोडून चोरट्यांनी लंपास केली रोकड

पुणे : ओंकारेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी सहा हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्या चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कौस्तुभ उल्हास गाडे ( ४०, रा. ओंकारेश्वर मंदिर, शनिवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ओंकारेश्वर मंदिरात शनिवारी मध्यरात्री शिरलेल्या चोरट्याने गाभाऱ्यातील दानपेटीचे कुलूप तोडून सहा हजार रुपये चोरुन नेले.
रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर गाडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी मंदिराच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून, चोरट्याचा माग काढण्यात येत आहे. या प्रकरणाचा पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.





