Pune: प्रारूप प्रभाग रचनेचे काम दोन दिवसात संपणार

पुणे : पालिकेच्या प्रभाग रचनेचे काम नियोजित वेळापत्रकानुसारच सुरू असून ते अंतीम टप्प्यात आले आहे. पुढील दोन दिवसांत प्रभाग रचनेचे काम संपणार असून त्यानंतर मसुद्यावर २५ ते ३१ जुलै दरम्यान समिती सदस्यांच्या सह्या होतील.
प्रभाग रचनेच्या २१ जूनच्या नव्या वेळापत्रकानुसार १ ते ५ ऑगस्ट दरम्यान प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा नगरविकास विभागास सादर होईल. त्यानंतर तो तपासून नगरविकास विभाग ६ ते ११ ऑगस्ट दरम्यान निवडणूक आयोगास सादर करेल. निवडणूक आयोगाकडून २२ ते २८ ऑगस्ट दरम्यान प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यासाठी पालिकेस पाठवणार आहे.
कॅन्टोन्मेंटचा परिणाम नाही
पालिकेच्या हद्दीतील पुणे, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पालिकेत समावेश करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. मात्र, समावेशाचा निर्णय अद्याप झालेला नाही. विलीनीकरण झालेले नसल्याने कॅन्टोन्मेंटचा पालिकेच्या प्रभाग रचनेवर कोणताही परिणाम होणार नाही.
मुख्यमंत्र्यांनी विलीनीकरणाबाबत बोलावलेल्या बैठकीवेळी संरक्षण मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार पुढील तीन महिन्यांत विलीनीकरण प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. शासनाने हद्दवाढीचा आदेशही काढलेला नाही. त्यामुळे प्रभाग, नगरसेवकांची संख्या वाढण्याच्या चर्चेला प्रशासनाने तूर्तास पूर्णविराम दिला आहे.





