PUNE: नव्या वर्षात तापमान वाढणार

पुणे – शहरात यंदा हुडहुडी भरणाऱ्या थंडीचा कडाका पुणेकरांना अनुभवताच आला नाही. डिसेंबरमधील थंडीचा कडाका म्हटल्यावर किमान तापमान 8 ते 9 अंशापर्यंत खाली येते. मात्र, यंदा किमान तापमान 10 अंशांच्या खाली आलेच नाही. त्यामुळे शहराच्या काही भागातील थंडीचा कडाका होता तर अन्य भागात थंडीचा जोर कमी – अधिक होता.
शहरातील कमाल व किमान तापमानात सातत्याने चढ-उतार होत असल्यामुळे थंडीचा जोरही कमी अधिक होत आहे. शुक्रवारी (दि. 29) शहरातील थंडीचा जोर कमी झाला होता. किमान तापमान 13 अंशसेल्सिअस इतके नोंदविले असून, पुढील दोन दिवस हवामानात फारसा बदल होणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
31 डिसेंबरप्रर्यंत शहरातील हवामान कोरडे राहील, तर अधून-मधून आकाश ढगाळ होईल. त्यानंतर नवीन वर्षात किमान तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून, शहरासह राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.





