PUNE: परिवहनची ऑनलाईन यंत्रणा ठप्प

पुणे – परिवहन विभागाची ऑनलाईन यंत्रणा वारंवार बंद पडत असल्याने व्हेंटिलेटरवर होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून ही यंत्रणा ठप्प झाल्यामुळे वाहन परवाना (लायसन्स) देण्याची कार्यवाही जवळपास बंद आहे, तसेच इतरही कामांवर त्याचा परिणाम झाला असून, नागरिकांना आरटीओत हेलपाटे मारावे लागत असल्याने मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
परिवहन विभागाची वाहन परवाना देण्याची सारथी यंत्रणा गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ठप्प आहे. त्यामुळे पक्के व शिकाऊ वाहन परवान्यांसाठी अपाइंटमेंट घेतलेल्या नागरिकांना विनाकारण हेलपाटे मारावे लागत आहेत. नागरिक लायसन्ससाठी ऑफीसला सुट्टी घेऊन येत असतात. मात्र, आरटीओमध्ये आल्यावर यंत्रणा बंद असल्याचे त्यांना समजत असल्यामुळे नागरिकांना मनःस्तापाबरोबरच आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
दोन दिवसांपासून ही यंत्रणा बंद होती. शुक्रवारी देखील नागरिकांकडून आरडाओरडा सुरू झाल्यानंतर पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने कार्यालयात सारथीची यंत्रणा बंद असल्याचे फलक लावला. या दिवसांमध्ये अपॉइंटमेंट घेतलेल्या नागरिकांना पुढील अपॉइंटमेंट घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
“संपूर्ण भारतात ही यंत्रणा बंद झालेली होती. आज सायंकाळी सर्व यंत्रणा सुरळीत झाली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नसून, नागरिकांना पक्के आणि शिकाऊ परवाने तात्काळ मिळतील.” – संजीव भोर – प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे





