पुणे : इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वह्यांची पाने समाविष्ट असलेली पाठ्यपुस्तके देण्याबाबतचा निर्णयही शालेय शिक्षण विभागाने रद्द केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ व त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानांशिवाय दिली जाणार आहेत. यातून माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना आणखी मोठा धक्का देण्यात आला असला, तरी महायुती शासनाकडून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबाच सुरूच असल्याचे चित्र आहे. शिक्षण व शिक्षणाचे साहित्य त्यांचे सार्वत्रिकरण होणे, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे, पाठ्यपुस्तके व वह्या यांच्या वजनाने दप्तराचे ओझे वाढणे, दप्तराच्या वाढत्या वजनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, खेडोपाडी गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेत शिकायला जाताना पुरेसे लेखन साहित्य उपलब्ध नसणे या सर्व घटकांचा विचार करून गेल्या वर्षीपासून इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट करण्यात आली होती. प्रायोगिक तत्वावर या निर्णयाची अंमलबजावणी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून सुरू केली. त्यानुसार विद्यार्थ्यांना वह्यांची पाने समाविष्ट असलेली पाठ्यपुस्तके वाटपही करण्यात आली. दप्तराचे ओझे कमी झालेच नाही विद्यार्थ्यांना वह्यांची पाने समाविष्ट असलेली पाठ्यपुस्तके देण्याबाबतच्या योजनेचा पुन्हा आढावा घेण्यात आला. पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वह्यांच्या कोऱ्या पानांचा विद्यार्थ्यांकडून शिकविलेल्या घटकांच्या नोंदी घेण्यासाठी अपेक्षेप्रमाणे उपयोग झाल्याचे दिसून आले नाही. योजनेचा उद्देश हा दप्तराचे ओझे कमी करणे असा होता. मात्र, विद्यार्थी पुस्तके व सोबत वह्या देखील घेऊन येत असल्याचे तसेच पाठ्यपुस्तकांमधील कोऱ्या पानांचा शैक्षणिक नोंदी घेण्याकरिता वापर होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या योजनेचा अपेक्षित उद्देश फारशा प्रमाणात सफल झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे आधी निर्णय रद्द करण्यात आला आहे.