इच्छुकांकडून पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह पुणे- महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार याद्या जाहीर न करता भाजपकडून सलग दुसऱ्या दिवशी उमेदवारांना थेट एबी फाॅर्म देण्यात आले. त्यामुळे अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. पक्षाकडून सोमवारी उमेदवारी दिलेल्या तीन ते चार ठिकाणचे उमेदवार बदलण्यात आले असून, नवीन उमेदवारांना एबी फाॅर्मसोबत पत्रही देण्यात आले. त्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली. पक्षाकडून सोमवारी १२० जणांना एबी फाॅर्म देण्यात आले. शिवसेनेसोबत चर्चा सुरू असल्याने त्यांच्याकडून मागणी असलेल्या जागांवर सोमवारी उमेदवार देण्यात आले नव्हते. मात्र, मंगळवारी दुपारी शिवसेनेकडून सरससकट सर्व जागांवर एबी फाॅर्म दिल्याने भाजपनेही उर्वरीत ४५ जागांवर उमेदवार देण्यात आले. त्यात, रिपाइंच्या ९ जागांचाही समावेश असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. बंडखोरीचा फटका पक्षाकडून सोमवारी डावलण्यात आल्याने अनेक इच्छुकांनी मंगळवारी सकाळपासून पक्षाच्या शहरातील पदाधिकारी कोअर कमिटीच्या सदस्यांना भेटण्यासाठी धडपड केली. मात्र, त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने इच्छुकांनी थेट सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत पक्षाच्या कार्यकर्त्यांना डावलून इतर पक्षांतील आयारामांना उमेदवारी दिल्याचे सांगत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. ज्या इच्छुकांना भाजपचे एबी फाॅर्म मिळाले नाहीत, त्यांनी इतर पक्षांतून उमेदवारीसाठी धडपड केली. मात्र, अनेकांना त्यात अपयश आले. त्यातच शहर पदाधिकाऱ्यांचे फोन बंद असल्याने अथवा त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अनेकांना आपली नाराजी लपविता आली नाही. चार उमेदवार बदलले भाजपकडून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चार उमेदवार बदलण्यात आले आहे. प्रभाग ७ मध्ये प्रकाश ढोरे यांच्या जागी सनी निम्हण यांना संधी देण्यात आली, तर प्रभाग ३१ मध्ये नीलेश कोंढाळकर यांच्या जागेवर दिनेश माथवड यांना संधी देण्यात आली. हर्षाली माथवड यांची उमेदवारी रद्द करून कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग २६ मध्ये सोमवारी माजी नगरसेवक सम्राट थोरात यांच्या पत्नी ऐश्वर्या थोरात यांना उमेदवारी देण्यात आल्याचे पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.