पुणे (विजयकुमार कुलकर्णी) –काळा रंग सूर्यप्रकाश शोषून घेत असल्यामुळे उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे वापरणे शक्यतो टाळले जाते. न्यायालयात पक्षकारांची बाजू मांडणारे वकील मात्र याला अपवाद ठरतात. आपल्या पेशाची ओळख सांभाळण्यासाठी दिवसभर त्यांना काळ्या कोटातच वावरावे लागते. तरीही उन्हाळ्यात काळा कोटाचा त्रास होऊ नये, यासाठी 15 मार्च ते 15 जून हे तीन महिने तो न वापरण्याची मुभा दिली आहे. वकिलांना मात्र कोट घातल्याशिवाय परिपूर्ण वाटत नाही. त्यामुळे मुभा असतानाही ते कोट घालूनच न्यायालयीन कामकाजात सहभागी होतात.
न्यायालयात पक्षकारांची बाजू मांडणाऱ्या वकिलांना काळा कोट हा ड्रेसकोड ठविण्यात आला आहे. त्यामुळे उन्हाळा असो वा पावसाळा त्यांना तो घालावाच लागतो. न्यायाधीशांपुढे बाजू मांडण्यासाठी येणाऱ्या वकिलाने ड्रेसकोड घातला आहे किंवा नाही, याची दखल घेतली जाते. न्यायाधीशांनी ड्रेसकोड न घातल्यामुळे वकिलांना सुनावल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे न्यायालयात हजर होताना प्रत्येक वकील ड्रेसकोडबाबत अतिशय दक्ष असतो. उन्हाळ्यात वकिलांना कोटमुळे युक्तिवाद करताना त्रास होऊ नये, यासाठी तीन महिने तो न वापरण्याची मुभा दिली आहे. राज्यातील ज्या भागात तापमान सर्वाधिक असते. तेथील वकिलांना या निर्णयाचा फायदा होतो. मात्र, तुलनेने कमी तापमान असलेल्या भागात वकील कोट वापरण्यास प्राधान्य देतात. पुण्यात वकिलांकडून उन्हाळ्यातही कोटचा वापर केला जातो.
कोटाशिवाय वकिली कल्पनाही करू वाटत नाही. कोट ही वकिलाची ओळख आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही वकील कोट घालण्यास प्राधान्य देतात. मात्र, तापमान जास्त असलेल्या, वीजपुरवठा खंडित होणाऱ्या अथवा सोयीसुविधा नसलेल्या भागांतील वकिलांना या निर्णयाचा फायदा होतो.
– ऍड. गणेश माने, शिवाजीनगर न्यायालयातील प्रॅक्टीस करणारे वकील
कोट घालायचा की नाही, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ठरते. मात्र, प्रॅक्टीस करताना कोट न घातल्यास चुकल्या चुकल्यासारखे वाटते. शहरात पंखे, कुलर असतात. त्यामुळे न्यायालयात उन्हाचा इतका त्रास होत नाही. तसेच, कोट न घालणे व्यावसायिकतेला धरून नाही. त्यात वकिलांना कोट घालण्याची सवयही असते. त्यामुळे बहुतांश वकील कोट घालतात.
– ऍड. हर्षल पाटील, शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टीस करणारे वकील