PUNE : शहर ‘सहा’ दिवस दणाणणार; ध्वनिक्षेपक रात्री 12 पर्यंतसाठी आणखी एक दिवस परवानगी

पुणे – गणेशोत्सव काळात ध्वनीक्षेपक रात्री 12:00 पर्यंत वाजविण्यासाठी यापूर्वी पाच दिवस निश्चित करण्यात आले होते. आता यामध्ये आणखी एक दिवस वाढवून देण्यात आला आहे. त्यानुसार सहा दिवस रात्री 12:00 पर्यंत ध्वनीक्षेपक वाजविता येणार आहे.
गणेशोत्सवासाठी यापूर्वीच्या आदेशानुसार शनिवार (दि.23) (पाचवा दिवस- गौरी विसर्जन), रविवार (दि.24) सहावा दिवस, सोमवार (दि.25) सातवा दिवस (गणेश विसर्जनाचा), मंगळवार (दि.26) आठवा दिवस, बुधवार (दि.27) नववा दिवस, गुरुवार (दि.28) दहावा दिवस- अनंत चतुर्दशी असे पाच दिवस ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा रात्री 12:00 वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात आली होती.
आता, नव्याने एकूण सहा दिवस नियमांचे पालन करून ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा रात्री 12:00 वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. विविध लोकप्रतीनिधी व गणपती मंडळे यांनी पुणे शहरात आणि जिल्ह्यात सार्वजनिक गणपती उत्सवामधील सातव्या दिवशी गणपती विसर्जन केले जात असल्याने सदर दिवसही विशेष बाब म्हणून वाढवून मिळण्याबाबत विनंती केली होती. याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनीही परवानगी देण्यात हरकत नसल्याचा अहवाला दिला.





