PUNE: शहरातील थंडीचा जोर ओसरला; मात्र सकाळी धुके आणि थंडी

पुणे – नववर्षाच्या सुरवातीपासूनच शहरातील किमान तापमानात दोन ते तीन अंशााने वाढ झाली आहे. त्यामुळे थंडीचा जोर कमी झाला आहे. मात्र, सकाळी धुके पडत असल्यामुळे दहा ते अकरा वाजेपर्यंत थंडी जाणवत आहे. बुधवारी (दि. 3) शहरात 15.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरात आकाश ढगाळ तर दि. 6 जानेवारीनंतर शहराच्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून वर्तविण्यात आले.
दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, उत्तर कोकणापासून पुढे उत्तरेकडे द्रोणीय स्थिती आहे. त्याच्या प्रभावामुळे हवेच्या वरील स्थरात चक्रीय स्थिती दक्षिण हरियाणा आणि लगतच्या परिसरात तयार झाली आहे. वाऱ्यामुळे कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात आर्द्रता वाढेल. धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस किमान तापमान एक ते दोन अंशाने वाढ होईल.





