पुणे : ‘2020’ची ‘टीईटी’ संशयाच्या भोवऱ्यात

पुणे – पुणे सायबर पोलिसांनी म्हाडा पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी प्रितिश देशमुख यांच्या घरझडतीमध्ये सायबर पोलिसांच्या हाती 2020 मध्ये टीईटी परिक्षेत अपात्र झालेल्या काही विद्यार्थ्यांची हॉल तिकीटे जप्त केली. दरम्यान, टीईटी परिक्षेची निगडीत असलेल्या महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे अतिवरिष्ठ अधिकाऱ्याकडे गुरूवारी सकाळपासून रात्री उशीरापर्यंत कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
पुण्यातील जी. ए. सॉफ्टवेअरचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख (रा. खराळवाडी, पिंपरी), अंकुश रामभाऊ हरकळ (रा. किनगावराजा, ता. सिंधखेडराजा,जि. बुलढाणा), संतोष लक्ष्मण हरकळ (रा. मिलेनियम पार्क, औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली असून त्यांना 18 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनाविन्यात आली आहे.
बुधवारी सायबर पोलिसांना आरोपी डॉ. प्रितिश देशमुख याच्या घराची झडती घेताना 2020 मध्ये झालेल्या टीईटी परिक्षेत अपात्र झालेल्या 40 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची हॉल तिकीटे सापडली होती. सुरूवातीला आरोग्य भरतीतून म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरण बाहेर निघाले. आता म्हाडाच्या पेपरफुटीच्या तपासातून टीईटी परिक्षेचे प्रकरण हाती लागले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. आता, या तपासात नेमके काय निष्पन्न होते, त्यानुसार पुढील कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे. चौकशीत ठोस काही हाती लागल्यास दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेत ही देण्यात आले आहे.





