Pune: पावसाच्या सुट्टीने तापमानात वाढ

पुणे – पावसाने उघडीप दिल्याने शहर, उपनगरात वाढत्या तापमानामुळे उकाडा वाढला आहे. शुक्रवारी (दि. १८) दिवसभर शहरात ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव सुरू होता. आज मगरपट्टा येथे सर्वाधिक ३०.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
जुलै महिन्यात पावसाची संततधार किंवा रिमझिम पावसामुळे कमाल तापमान ३० अंशाच्या खालीच असते. मात्र, यंदा मे आणि जून महिन्यात पाऊस झाला आणि जुलै महिन्यात पावसाने उघडीप दिली. गेल्या ४८ तासात कमाल तापमानात चार ते पाच अंशाने वाढ झाली आहे. परिणामी २८ अंशावरील कमाल तापमान ३४ अंशापर्यंत पोहचले.
हंगामातील हे सर्वाधिक कमाल तापमान असून, या वाढत्या तापमानामुळे शहर आणि उपनगरात उकाडा वाढला होता. शुक्रवारी पुन्हा ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात काहीशी घट झाली. जिल्ह्यातील बारामती येथे ३२ तर शहर परिसरात ३१ अंशापर्यंत तापमान नोंदवले गेले. दुपारनंतर उपनगरातील काही भागात हवेत गारवा होता. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस शहरासह जिल्ह्यात आकाश सामान्यत: ढगाळ व पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.





