Pune : स्वानंद प्राथमिक विद्यालयामध्ये ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा

पुणे : स्वानंद प्राथमिक विद्यालय व बालक मंदिर, धायरी येथे शिक्षकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी स्त्री सक्षमीकरणासाठी कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या राजश्री वाघमारे ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच, संस्थेचे अध्यक्ष प्रशांत मनोरे , प्रबोधिनीचे सचिव संतोष पवार , मुख्याध्यापिका डॉ.श्रुती मनोरे, शिक्षक प्रतिनिधी वंदना कदम यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रमुख पाहुण्या राजश्री वाघमारे यांच्या हस्ते शाळेतील सर्व शिक्षिका, सहायक व सेवक वर्ग यांना सन्मानित करून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. इयत्ता १ ली ते ७ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करणारी वाक्ये स्टिकी नोट्स वर लिहून फलकावर सुशोभन केले. त्याचबरोबर आपल्या मनातील विविध प्रश्न शिक्षकांना विचारले व त्याची समर्पक उत्तरे शिक्षकांनी दिली. याप्रसंगी शाळेतील वातावरण अत्यंत आनंददायी व उत्साही बनले.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे खूप कौतुक केले. सामाजिक कार्यकर्त्या राजश्रीताई वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने घडविणाऱ्या दोन व्यक्तिमत्वाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला, एक म्हणजे आई व दुसरी शिक्षिका, तसेच मोबाईल वापर कमी करा,
वाचन, खेळाची आवड जोपासा, समाजहिताचे कार्य करा, खरे बोला, अन्यायाला विरोध करा, अशा विविध महत्त्वपूर्ण गोष्टीबद्दल विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांनी बालसभेचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी पाटील व आभार प्रदर्शन निलिमा निगडे यांनी केले.





