पुणे – पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या मतदार यादी नव्याने तयार करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत ६ नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणीची संधी उपलब्ध असून सर्व पात्र पदवीधर व शिक्षकांनी नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे. विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच विविध शासकीय विभागांच्या प्रमुखांशी संवाद साधून मतदार नोंदणीच्या प्रगतीचा आढावा घेतला. पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी सुरू आहे. ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. २०२६ मध्ये पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाकरिता होणाऱ्या निवडणुकीसाठी पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी आहेत. तसेच, प्रत्येक विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रापुरते मतदार नोंदणीचे काम करीत आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत यापूर्वीच्या पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघाच्या मतदारयादीत नाव समाविष्ट असले तरी पुन्हा नव्याने पात्र मतदारांचे नाव यादीत समाविष्ट करणे आवश्यक आहे, असेही डॉ. पुलकुंडवार यांनी नमूद केले.